महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एकनाथ खडसे महाराष्ट्राचे 'अडवाणी'? पुनर्वसनाची उरलीसुरली आशाही मावळली - jalgaon politics

पक्षात नव्यानेच आलेल्यांसाठी या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपदाचे 'रेड कार्पेट' अंथरण्यात आले तर, एकनाथ खडसेंसारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला मात्र दूर ठेवण्यात आले. खडसेंच्या बाबतीत भाजपने घेतलेली भूमिका पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

एकनाथ खडसे महाराष्ट्राचे 'अडवाणी'?

By

Published : Jun 17, 2019, 8:01 AM IST

जळगाव- आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अवघ्या ३ महिन्यांसाठी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा डावलले आहे. भाजपच्या सापत्न वागणुकीमुळे एकनाथ खडसे यांच्या पुनर्वसनाची उरलीसुरली आशाही मावळली असून ते महाराष्ट्राचे 'अडवाणी' ठरल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला रविवारी अखेर पूर्णविराम मिळाला. पक्षात नव्यानेच आलेल्यांसाठी या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपदाचे 'रेड कार्पेट' अंथरण्यात आले तर, एकनाथ खडसेंसारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला मात्र दूर ठेवण्यात आले. खडसेंच्या बाबतीत भाजपने घेतलेली भूमिका पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवून आगामी काळात महाजन हेच जळगाव जिल्ह्याचे सर्वेसर्वा राहणार असल्याचे पक्षनेतृत्त्वाने सूचित केले होते.

खडसेंसारखा मास लीडर असताना गिरीश महाजनांच्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडणे म्हणजे एकप्रकारे खडसेंचे राजकीय खच्चीकरण होते. हे कमी की काय, आता पक्षनेतृत्त्वाने मंत्रिमंडळ विस्तारात खडसेंना डावलून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. खडसेंच्या पुनर्वसनाला खो देऊन भाजपने गिरीश महाजनांच्या जिल्ह्यातील नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब केले आहे. खडसेंना बाजूला करत आता गिरीश महाजन हे जिल्ह्याचे नेते झाले आहेत.

2014 मध्ये सत्तास्थापनेवेळी एकनाथ खडसे हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. मात्र, ही बाब पक्षातील काही लोकांचा स्वाभिमान दुखावणारी ठरली. मुख्यमंत्रीपद तर दूरच राहिले पण मुख्यमंत्रीपदाची मनीषा बाळगल्याने खडसेंना मोठी किंमत मोजावी लागली. नंतरच्या काळात भोसरीतील जमीन गैरव्यवहार, दाऊदच्या पत्नीशी फोनवरून झालेले कथित संभाषण तसेच स्वीय सहायकाचे लाचप्रकरण अशा एक ना अनेक आरोपांमुळे खडसेंना जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासह तब्बल 12 महत्त्वपूर्ण खात्यांच्या मंत्रीपदावर पाणी सोडावे लागले. जून 2016 पासून ते मंत्रिमंडळाबाहेर आहेत. कालांतराने आरोपांवर निर्दोषत्व मिळून देखील खडसेंना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. योग्य वेळ आल्यावर खडसेंचे पुनर्वसन केले जाईल, असे सांगत पक्षनेतृत्त्वाने त्यांना झुलवत ठेवले. पाहता पाहता सरकारचा कार्यकाळ संपुष्टात येण्यासाठी अवघा ३ महिन्यांचा काळ उरला आहे. मात्र, ती योग्य वेळ आलीच नाही. आता शेवटच्या ३ महिन्यांसाठी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात देखील खडसेंना डावलण्यात आल्याने खडसे समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत.

खडसेंनी आपल्या जीवनाची 40 ते 42 वर्षे भाजप वाढीसाठी खर्ची घातली आहेत. 1970 ते 1980 च्या कालखंडापासून ते पक्षासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. राज्यात सरकार नसताना जळगाव जिल्ह्यात भाजपचे खासदार, आमदार सातत्याने निवडून येत आहेत. नंतरच्या काळात ग्रामपंचायतींपासून ते नगरपरिषद, महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपची पाळेमुळे रुजली. या प्रवासात खडसेंचे योगदान विसरता येण्यासारखे नाही. त्यांच्या आजवरच्या प्रवासाचे मूल्यमापन केले तर त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी खडकावर बीजारोपण केले. मात्र, आता जिल्ह्यातील भाजपची भक्कम तटबंदी पाहता राजकीय माती भुसभुशीत झाली आहे. त्यात कोणतेही बी पेरले तर त्याचं पीक येणारच आहे. म्हणूनच कदाचित भाजपला खडसेंचे नेतृत्व, त्यांचे वक्तृत्व या बाबींची गरज उरली नसावी, अशी खंत खडसे समर्थकांना आहे.

गेल्या ४ वर्षांच्या काळात डोकावून पाहिले तर एक बाब प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे खडसेंना पक्षनेतृत्त्वाने जाणीवपूर्वक दूर ठेवले. खडसेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गिरीश महाजन यांना पाठबळ देण्याचे काम भाजपकडून झाले. गिरीश महाजन हे खडसेंच्या तालमीत तयार झाले आहेत. मात्र, आता तेच खडसेंवर वरचढ ठरले आहेत. मराठा क्रांती मोर्चा, शेतकरी-आदिवासींचे मोर्चे, सरकारविरोधात अण्णा हजारे यांनी उभारलेले आंदोलन यासारख्या कठीण काळात योग्य मध्यस्थी करत सरकारची लाज राखल्याने ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणजेच 'संकटमोचक' मंत्री झाले. त्यानंतर जळगाव, धुळे, नाशिक, नगर आणि पालघर महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकवल्याने ते मुख्यमंत्र्यांचे विश्वासू बनले. लोकसभा निवडणुकीत देखील उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी खांद्यावर घेऊन त्यांनी नेतृत्त्वाची चुणूक दाखवली. पक्षाच्या सर्वच आघाड्यांवर खरे उतरल्याने आता त्यांच्यावर विधानसभेची जबाबदारी असेल, यात शंका नाही. गिरीश महाजन यांनी आपल्यातील नेतृत्त्वगुण सिद्ध केल्याने कदाचित खडसेंची गरज पक्षाला उरली नसावी, म्हणून त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आले असावे, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details