महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हे तर भाजपच्या नेतृत्वाचे अपयश; एकनाथ खडसेंची टीका - एकनाथ खडसे भाजपवर टीका

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज (शुक्रवारी) समोर आले. या निकालाबाबत एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

eknath khadse
एकनाथ खडसे - नेते, राष्ट्रवादी

By

Published : Dec 4, 2020, 3:14 PM IST

जळगाव -पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली आहे. आजपर्यंत वर्षानुवर्षे नागपूर, पुणे हे मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होते. पारंपरिक मतदारसंघही भाजपने यावेळी गमावले. परंतु, यावेळी महाविकास आघाडी सरकारने सहापैकी पाच मतदारसंघात विजय मिळवला. हे भाजपच्या नेतृत्वाचे अपयश आहे. भाजपच्या नेतृत्वाच्या अहंपणाचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसून येत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी टीका केली आहे.

एकनाथ खडसे - नेते, राष्ट्रवादी

हेही वाचा -'मित्र सोबत असता तर बळ मिळाले असते'; चंद्रकांत पाटलांना उपरती

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज (शुक्रवारी) समोर आले. या निकालाबाबत एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. खडसे पुढे म्हणाले की, या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर मतदारसंघातील जागा गेली, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुणे मतदारसंघाची जागा गेली. कुणी पक्षातून बाहेर पडले म्हणजे पक्षाला काहीही फरक पडत नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. आता त्यांना दिसले की कुणी गेले तर काय फरक पडतो. मधल्या कालखंडात ते म्हणाले होते की हिमालयात निघून जाईल, आता मी तेच बघतोय ते हिमालयात निघून जातात का? असा चिमटा देखील खडसेंनी चंद्रकांत पाटलांना यावेळी काढला. दरम्यान, या निवडणुकीत सहापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीला यश आले. एका जागेवर भाजपचा उमेदवार निवडून आला. परंतु, महाविकास आघाडीचे मतदान फुटले म्हणून आम्हाला विजय मिळाला, असे खुद्द भाजपने मान्य केले आहे. म्हणजेच सहाच्या सहा जागांवर भाजपची पिछेहाट झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही खडसेंनी सांगितले.

भाजपच्या नेतृत्वाने अपयशाची जबाबदारी स्वीकारावी-

या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. भाजपच्या नेतृत्वाने या अपयशाची जबाबदारी स्वीकारावी, असे सांगत खडसे म्हणाले की, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी मतदान केले आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला, म्हणजेच त्यांनी या सरकारच्या वर्षभरातील कामकाजाचे मूल्यमापन केले असेलच. पूर्वीच्या भाजपच्या सरकारकडून या सुशिक्षित मतदारांनी काहीतरी अपेक्षा व्यक्त केल्या असतील आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसतील म्हणूनच आता महाविकास आघाडी सरकारला कौल मिळाला. या निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता व नाराजी निर्माण झाली आहे. ही नाराजी भविष्यात समोर येईलच, असेही खडसे म्हणाले.

महाराष्ट्राचा कौल काय आहे, हे स्पष्ट झाले-

या निवडणुकीचा निकाल म्हणजे भविष्यातील निवडणुकांची नांदी आहे, असे म्हणणे चुकीचे तसेच राजकारणात वेडेपणा ठरेल. मात्र, या निवडणुकीची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर होती. याशिवाय या निवडणुकीत सुशिक्षित मतदारांची भूमिका महत्वपूर्ण होती. सुशिक्षित मतदारांनी दिलेला कौल पाहता संपूर्ण महाराष्ट्राचा कौल काय आहे, हे स्पष्ट झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -ईडी प्रकरण : आमदार प्रताप सरनाईक 'नॉट रिचेबल'

ABOUT THE AUTHOR

...view details