जळगाव - ऐकमेकांवर आरोप - प्रत्यारोप केल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन आज आमने - सामने आले. जळगाव जिल्हा भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली असून, या बैठकीमध्ये खडसे-महाजन एकाच मंचावर आले आहेत.
जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत खडसे आणि महाजन एकत्र आले. ही बैठक वसंतस्मृती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले होते. त्यांनीच माझे तिकीट कापल्याचे खडसे म्हणाले होते. गेल्या अनेक दिवसापासून एकनाथ खडसे भाजपवर नाराज आहेत. ते सातत्याने भाजपवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीका करत आहेत. अनेकवेळा त्यांनी दुसऱ्या पक्षातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या आहेत. त्यामुळे खडसे भाजपला सोडचिठ्ठी देणार का? याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, आज खडसे आणि महाजन एकत्र आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
आरोप-प्रत्यारोपानंतर खडसे आणि महाजन एकाच मंचावर जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी होणार आहे. या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला एकनाथ खडसे, गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, संघटनमंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, आमदार मंगेश चव्हाण हे उपस्थित होते.
या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या बहुमताबाबत चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे खडसे आणि महाजन हे एकमेकांसोबत काय चर्चा करतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. दरम्यान, बैठकीपूर्वी खडसे आणि महाजन यांनी एकमेकांशी बोलणे टाळले. मात्र, बैठकीला सुरुवात झाल्यावर ते एकमेकांच्या आजूबाजूला बसलेले होते.