जळगाव - माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेत युती झाल्याचे स्वागत केले आहे. तसेच आता युतीचा मुख्यमंत्री होणार असाही दावा केला आहे. ते भाजप-शिवसेनेच्या युती संदर्भात मुंबईत घोषणा झाल्यानंतर मुक्ताईनगर येथे आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
एकनाथ खडसे पुढे म्हणाले, की ५ वर्षांपूर्वी भाजप आणि शिवसेनेने लोकसभेची निवडणूक एकत्र लढली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत युती होऊ शकली नाही. त्या कालखंडात भाजपला अनुकूल वातावरण होते. स्वबळावर लढण्याचा पक्षाचा निर्णय असल्याने विरोधी पक्षनेता असताना त्याबाबतची घोषणा पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी केली होती. आता मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती असावी, असा पक्षाचा निर्णय होता आणि सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे नेतृत्व करत असल्याने त्यांनी युतीची घोषणा केली, असे खडसे यांनी सांगितले.