महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाथाभाऊ पुन्हा बरसले; म्हणाले पक्ष तिकीट देवो अथवा न देवो, जनता माझ्या पाठीशी - खदखद

'माझ्यावर झालेल्या आरोपांबाबत मी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत काही मुद्दे मांडले. पण त्यावर सरकारकडे काहीही उत्तर नाही. माझ्या मुद्यांवर सरकारने स्पष्टीकरणाचा चकार शब्दही काढला नाही. आता पक्ष तिकीट देवो अथवा न देवो, जनता माझ्या पाठीशी आहे', असे सांगत त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे

By

Published : Jul 5, 2019, 11:31 PM IST

जळगाव - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मनात पक्षाविषयी असलेली खदखद पुन्हा एकदा बाहेर आली आहे. त्यांच्यावरील आरोपांबाबत चौकशी होऊनही पक्षाने स्पष्टीकरण न दिल्याने ते जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आहेत. 'माझ्यावर झालेल्या आरोपांबाबत मी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत काही मुद्दे मांडले. पण त्यावर सरकारकडे काहीही उत्तर नाही. माझ्या मुद्यांवर सरकारने स्पष्टीकरणाचा चकार शब्दही काढला नाही. आता पक्ष तिकीट देवो अथवा न देवो, जनता माझ्या पाठीशी आहे', असे सांगत त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात शुक्रवारी भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खडसेंनी आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत पक्षश्रेष्ठींना लक्ष्य केले. ते म्हणाले की दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांना मानसन्मान मिळत आहे. मंत्रीपदे वाटली जात आहेत. मात्र, पक्षातील निष्ठावंतांची अवहेलना सुरू आहे. आज भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात जे सुरू आहे, तेच माझ्याही मनात सुरू आहे. माझा काय दोष होता? तो पक्षाने सांगितला पाहिजे होता. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत मी माझ्यावर झालेल्या आरोपांबाबत काही मुद्दे मांडले. पण त्यावर सरकारने उत्तर दिले नाही. ते जाहीरपणे तेथे सांगू शकत नव्हते तर त्यांनी मला एकट्यात बोलावून सांगितले पाहिजे होते. खडसे तुम्ही हा भ्रष्टाचार केला आहे, तुम्ही ही बदमाशी केली आहे. पण सरकारने मी मांडलेल्या मुद्यांवर चकार शब्दही काढला नाही.


मी होतो म्हणून टिकलो. दुसरे कोणी एवढा अन्याय सहन करू शकला नसता. माझ्यावर नुसते आरोपच झाले नाहीत तर माझ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची, आयकर विभागाची चौकशी लावण्यात आली. हे कमी की काय म्हणून दहशतवाद विरोधी पथकाने देखील माझी चौकशी केली. पण त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. हा केवळ अन्याय आहे. मला कोणी काहीही म्हणो. पण मी आता बोलणारच आहे. आता पक्ष तिकीट देवो अथवा न देवो, जनता माझ्या पाठीशी आहे, या शब्दांत खडसेंनी आपली नाराजी व्यक्त केली.

...तर हे घरात घुसून तुमच्या थोबाडीत मारतील
मी आहे म्हणून कार्यकर्त्यांना हिंमत आहे. मला जरा बाजूला होऊ द्या, घरात घुसून हे तुमच्या थोबाडीत मारतील, अशा शब्दांत खडसेंनी पक्षश्रेष्ठींवर टीकास्त्र डागले. माझ्यावर एवढा अन्याय होऊनही मी कधी पक्षनिष्ठा सोडली नाही. माझ्याविषयी पक्षश्रेष्ठी कितीही वाईट वागले असतील पण मी पक्षासाठी काम करत राहणार आहे. मला आजही फेसबुक, व्हाट्सएपवर कार्यकर्ते तसेच लोकांच्या कमेंट येतात. तुम्ही एवढा अन्याय का सहन करतात, असे त्या कमेंटमध्ये प्रश्न असतात. पण मी कधीही त्या बाजूने विचार केला नाही, असेही खडसे यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details