महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात भाजपला धक्का; खडसेंच्या कन्येसह हरिभाऊ जावळे पराभूत

जिल्ह्यासह अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या मुक्ताईनगरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसेंचा धक्कादायक पराभव केला आहे. त्याचप्रमाणे रावेरात भाजपचे विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांनाही काँग्रेसच्या शिरीष चौधरी यांच्याकडून पराभवाचे तोंड पहावे लागले आहे.

जळगाव जिल्ह्यात भाजपला धक्का; एकनाथ खडसेंच्या कन्येसह हरिभाऊ जावळे पराभूत

By

Published : Oct 25, 2019, 1:30 PM IST

जळगाव - विधानसभा निवडणुकीच्या निकालात जळगाव जिल्ह्यात भाजप-सेनेने प्रत्येकी 4, राष्ट्रवादी काँग्रेसने 1 स्वतःची तसेच एक पुरस्कृत अशा 2 तर काँग्रेसने 1 जागा पटकावली आहे. भाजपच्या बाजूने विचार केला तर हा निकाल भाजपला धक्का देणारा ठरला आहे.

जिल्ह्यासह अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या मुक्ताईनगरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसेंचा धक्कादायक पराभव केला आहे. त्याचप्रमाणे रावेरात भाजपचे विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांनाही काँग्रेसच्या शिरीष चौधरी यांच्याकडून पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. विशेष म्हणजे, यावेळी सेनेचे संख्याबळ एका जागेने वाढले तर भाजपचे संख्याबळ 2 जागांनी घटले आहे. काँग्रेसने आपले खाते उघडले असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही दोन जागांवर आपले उमेदवार निवडून आणले आहेत.

हेही वाचा - जळगाव ग्रामीण मतदारसंघातून सेनेचे गुलाबराव पाटील विजयी

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या ११ पैकी ११ जागा निवडून आणण्याचे स्वप्न पाहणारे मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचेही पाय या निकालामुळे जमिनीवर आले आहेत. भाजपच्या जिल्ह्यातील 2 तर सहयोगी सदस्य असलेली 1 अशा 3 जागा कमी झाल्याने राज्यभर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करत फिरणाऱ्या गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एकीकडे एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे तसेच विद्यमान ज्येष्ठ आमदार हरिभाऊ जावळे यांचा धक्कादायक पराभव झाल्याने भाजपला जोरदार हादरा बसला आहे. तर दुसरीकडे, बंडखोरीचा सामना करणाऱ्या शिवसेनेने जिल्ह्यातील आपल्या वाट्याला असलेल्या चारही जागा राखल्या आहेत. यावेळी खूपच अनपेक्षित निकाल लागला आहे. जिल्ह्यातील ११ मतदारसंघात १०० उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यात महायुती व महाआघाडीतील बहुतांश लढती या अत्यंत चुरशीच्या झाल्याने उमेदवारांसह समर्थकांच्या हृदयाचे ठोके चुकले आहेत. अटीतटीच्या लढतींमध्ये भाजपला ४ शिवसेनेला ४, काँग्रेसला १ तर राष्ट्रवादी १ आणि राष्ट्रवादी पुरस्कृत १ उमेदवार असा निकाल समोर आला आहे.

हेही वाचा - 'महा' विधानसभा : 'उत्तर महाराष्ट्र' युतीच्या जागा टिकणार की वाढणार? काँग्रेस राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई

खडसेंना धक्का; जावळेही पराभूत -़

गेल्या ३० वर्षांपासून सलग सहावेळा निवडून येत मुक्ताईनगर मतदारसंघावर अधिराज्य गाजविणारे एकनाथ खडसेंना या निकालामुळे मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे यांचा निसटता पराभव झाला. शिवसेनेचे बंडखोर व राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा १ हजार ९८७ मतांनी विजयी झाला आहे. अटीतटीच्या व अखेरच्या फेरीपर्यंत चढ-उतार झालेल्या या लढतीत अखेर चंद्रकांत पाटलांनी रोहिणी खडसेंचा पराभव केला. खडसेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.

यासह भाजपचे ज्येष्ठ नेते रावेर मतदारसंघातील आमदार हरिभाऊ जावळे यांचा काँग्रेसचे उमेदवार शिरीष चौधरी यांनी १५ हजार ६०९ मतांनी पराभव केला आहे. गेल्या वेळी अमळनेर मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले भाजपचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांनी यावेळी भाजपकडून निवडणूक लढविली होती. त्यांचा राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील यांनी पराभव केला आहे.

हेही वाचा - 'महा' विधानसभा : 'विदर्भ' भाजप आपला गड राखणार का ?

बंडखोरांवर मात करीत सेना सुसाट -

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेत महायुती असली तरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या चार जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्ध भाजपच्या उमेदवारांनी बंडखोरी करीत दंड थोपटले होते. तरी देखील शिवसेनेने आपल्या मागील 3 जागा राखत चारही जागांवर विजय मिळवला आहे. त्यात जळगाव ग्रामीण मतदारसंघातून सेनेचे उपनेते गुलाबराव पाटील, पाचोरा येथून सेनेचे आमदार किशोर पाटील, चोपडा येथून सेनेचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे तर एरंडोल मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार डॉ. सतीश पाटील यांचा पराभव करीत सेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील विजयी झाले आहेत.

भाजपचे संख्याबळ दोनने घटले -

सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत 6 जागांवर असलेल्या भाजपच्या यावेळी 2 जागा घटल्या आहेत. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी जामनेर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या संजय गरुड यांचा भराभव केला आहे. जळगाव शहरचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी राष्ट्रवादीच्या अभिषेक पाटील यांना पराभूत करुन ६४ हजारांच्या विक्रमी मताधिक्याने पुन्हा विजयी झाले आहेत. भुसावळ येथून भाजपचे संजय सावकारे यांनी राष्ट्रवादीच्या जगन सोनवणे यांचा पराभव करीत आपली जागा कायम राखली आहे. तर चाळीसगाव येथून भाजपकडून प्रथमच निवडणूक लढविणाऱ्या मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या राजीव देशमुख यांचा पराभव केला आहे. भाजपला यावेळी रावेर आणि मुक्ताईनगर या जागांवर पराभव पत्करावा लागला आहे.

मतदारसंघ निहाय आकडेवारी अशी -
१) भुसावळ

संजय सावकारे (भाजप) ८१६८९
डॉ. मधू मानवतकर (अपक्ष) २८६७५
जगन सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस) २०२४५
सुनील सुरवाडे (वंचित बहुजन आघाडी) ६८६८

२) चोपडा

लता सोनवणे (शिवसेना) ७८१३७
जगदीश वळवी (राष्ट्रवादी काँग्रेस) ५७६०८
प्रभाकर सोनवणे (अपक्ष) ३२४५९
डॉ. चंद्रकांत बारेला (अपक्ष) १७०८५

३) अमळनेर

अनिल भाईदास पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) ९३७५७
शिरीष चौधरी (भाजप) ८५१६३
श्रावण वंजारी (वंचित बहुजन आघाडी) १९०९
अनिल पाटील (अपक्ष) १०६१

४) जळगाव शहर

सुरेश भोळे (भाजप) ११३३१०
अभिषेक पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) ४८४६४
ऍड. जमील देशपांडे (मनसे) ३४८१
अशोक शिंपी (बसपा) १२१४

५) रावेर

शिरीष चौधरी (काँग्रेस) ७७९४१
हरिभाऊ जावळे (भाजप) ६२३३२
अनिल चौधरी (अपक्ष) ४४८४१
हाजी सय्यद मुश्ताक (वंचित बहुजन आघाडी) ६७०७

६) जामनेर

गिरीश महाजन (भाजप) ११४७१४
संजय गरुड (राष्ट्रवादी काँग्रेस) ७९७००
भीमराव चव्हाण (वंचित बहुजन आघाडी) ६४७१
विजय तंवर (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी) २११८

७) पाचोरा

किशोर पाटील (शिवसेना) ७५६९९
अमोल शिंदे (अपक्ष) ७३६१५
दिलीप वाघ (राष्ट्रवादी काँग्रेस) ४४९६१
नरेश पाटील (वंचित बहुजन आघाडी) ३२१४

८) एरंडोल

चिमणराव पाटील (शिवसेना) ८२६५०
डॉ. सतीश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) ६४६४८
गोविंद शिरोळे (अपक्ष) २४५८७
गौतम पवार (वंचित बहुजन आघाडी) २३०३

९) चाळीसगाव

मंगेश चव्हाण (भाजप) ८६५१५
राजीव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस) ८२२२८
मोरसिंग राठोड (वंचित बहुजन आघाडी) ३८४२९
डॉ. विनोद कोतकर (अपक्ष) ४६१७

१०) जळगाव ग्रामीण

गुलाबराव पाटील (शिवसेना) १०५७९५
चंद्रशेखर अत्तरदे (अपक्ष) ५९०६६
पुष्पा महाजन (राष्ट्रवादी काँग्रेस) १७८९२
जितेंद्र देशमुख (अपक्ष) ५८३०

११) मुक्ताईनगर

चंद्रकांत पाटील (अपक्ष) ९१०९२
ऍड. रोहिणी खडसे (भाजप) ८९१३५
राहुल पाटील (वंचित बहुजन आघाडी) ९७१५
भगवान इंगळे (बसपा) १५८३

ABOUT THE AUTHOR

...view details