जळगाव - तालुक्यातील धानवड गावातील १८ शेतकऱ्यांची तीन व्यापाऱ्यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीनही व्यापाऱ्यांनी संगनमताने शेतकऱ्यांकडून ३५ लाख ११ हजार रुपये किंमतीचा कापूस मोजून घेत पैसे न देताच पोबारा केला आहे. याप्रकरणी गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल व्यास, गोलू तिवारी आणि प्रदीप, अशी संशयित आरोपींची नावे असून तिघे जळगावातील अयोध्यानगरातील रहिवासी आहेत. धानवड गावातील शेतकऱ्यांकडून तिघांनी २० मे २०२० रोजी कापूस खरेदी केला होता. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना १५ दिवसात कापसाचे पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. सर्व शेतकऱ्यांचा विश्वास त्यांनी संपादन केला होता. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गावातील १८ शेतकऱ्यांनी कमी-अधिक प्रमाणात कापूस विकला होता. तीनही व्यापाऱ्यांनी (एम.एच. १९ सी.वाय. ०७१७) क्रमांकाच्या ट्रकमधून शेतकाऱ्यांचा कापूस नेला.
सर्वांचे मिळून ३५ लाख ११ हजार २८९ रुपयांचे पेमेंट झाले होते. १५ दिवस उलटल्यानंतरही त्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले नाही. पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वाल्मीक पाटील (वय ४०, रा. धानवड) या शेतकऱ्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरुन तीनही व्यापाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.