महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत साडेआठ हजार बालकांना कोरोनाची लागण, ५ बालकांचा मृत्यू

आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात साडेआठ हजारांहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली असून, त्यात ५ मुलांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाकडे आहे.

Jalgaon
जळगाव रुग्णालय

By

Published : May 28, 2021, 5:27 PM IST

Updated : May 28, 2021, 6:16 PM IST

जळगाव -'लहान बालकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. त्यामुळे त्यांना कोरोनाचा धोका नसतो', हा समज खोटा ठरवणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बालके व १५ वर्षांपर्यंतच्या बाधित होणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात साडेआठ हजारांहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली असून, त्यात ५ मुलांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाकडे आहे.

माहिती देताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण

जळगाव जिल्ह्यात साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढून दुसरी लाट धडकली. त्यापूर्वी पहिल्या लाटेत जिल्ह्यात सुमारे ३ हजार ८७२ मुलांना (म्हणजेच शून्य ते १५ वर्षांपर्यंतचा वयोगट) कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर १५ फेब्रुवारीपासून दुसरी लाट तीव्र झाली. त्यात आतापर्यंत ४ हजार ७०४ बालकांना कोरोना झाला आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेचा एकत्रितपणे विचार केला तर जिल्ह्यात आतापर्यंत ८ हजार ५७६ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. दुर्दैवाने यातील ५ बालकांचा मृत्यू झाला. याशिवाय लहान मुलांमध्ये गंभीर लक्षणे आढळून आली आहेत.

हेही वाचा -'आई-बाबा बाय..' अशी चिठ्ठी लिहून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

  • तिसऱ्या लाटेची शक्यता, पण बालरोगतज्ज्ञ आहेत कुठे?

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यात बालकांना सर्वाधिक धोका राहणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणेत पुरेसे बालरोगतज्ज्ञच नसल्याचे वास्तव आहे. अशा परिस्थितीत तिसरी लाट रोखणार कशी? हा प्रश्न आहे. जिल्ह्यातील एकाही आरोग्य केंद्रांमध्ये बालरोगतज्ज्ञ नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील ३ उपजिल्हा रुग्णालयांमध्ये केवळ ४ तर जिल्हा सामान्य रुग्णालयात १० बालरोगतज्ज्ञ आहेत.

  • एकाच व्यवस्थेवर अवलंबून राहणे जोखमीचे-

जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाबाधित मुलांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवजात शिशू काळजी कक्ष विभाग तसेच लहान मुलांचा कक्ष अशी व्यवस्था आहे. मात्र, तिसऱ्या लाटेत एकाच व्यवस्थेवर अवलंबून राहणे जोखमीचे आहे. जिल्हाभरातील २६५ आरोग्य उपकेंद्रांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या नियुक्ती केली आहे. मात्र, आरोग्य केंद्रांमध्ये बालरोगतज्ज्ञ नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर बालकांना उपचार मिळू शकणार नाहीत.

  • टास्क फोर्सची केली पुनर्स्थापना-

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यात रावेर, जामनेर, चोपडा, मुक्ताईनगर या ठिकाणी बालरोगतज्ज्ञ आहेत. यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र बालरोग विभाग आहेत. या ठिकाणी पुरेशी यंत्रणा आहे. मोहाडी येथे मुलांसाठी स्वतंत्र कक्ष करण्यात येणार असून, खासगी डॉक्टरांचीही यात मदत घेण्यात येईल. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय व खासगी डॉक्टरांच्या टास्क फोर्सची पुनर्स्थापना केली आहे, असेही डॉ. चव्हाण म्हणाले.

  • लहान मुलांमध्ये आढळतोय 'मल्टिसिस्टिम इफ्लेमॅटरी सिंड्रोम'

कोरोनातून बरे होणाऱ्या लहान मुलांमध्ये मल्टिसिस्टिम इफ्लेमॅटरी सिंड्रोम (मीस) हा आजार आढळत आहे. जळगाव जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत या आजाराचे १० ते १२ रुग्ण आढळून आले आहेत. या आजारात आयव्ही इम्युनोग्लोबिलिन औषध उपयुक्त ठरते. डोळे लाल होणे, अंगावर सूज, पूरळ येणे, तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप असणे ही लक्षणे आजारात दिसून येतात. अशी काही लक्षणे बालकांमध्ये दिसत असतील तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन तज्ञांनी केले आहे.

हेही वाचा -'एका वर्षात 1 हजार अॅलोपॅथी डॉक्टरांना आयुर्वेदात रुपांतरीत करेन'

Last Updated : May 28, 2021, 6:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details