जळगाव- अंडी उत्पादक व्यावसायिकांसाठी सप्टेंबरचा महिना लाभदायक ठरल्याचे चित्र आहे. 100 अंड्याचा दर 600 रुपयांवर गेला आहे. कोरोनाच्या भीतीने मार्च-एप्रिलमध्ये पोल्ट्री व्यवसाय उद्धवस्त झाल्याने व्यावसायिक रस्त्यावर आले होते. मात्र, आता आरोग्याच्या दृष्टीने अंडी खाणे चांगले असल्याचा सल्ला दिला जात असल्याने पोल्ट्री उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी भाव मिळत आहे. येत्या नोव्हेंबर, डिसेंबरनंतर नवीन माल येणार असल्याने अंड्यांचे दर अजून वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
जळगावात शेकडा 600 रुपयांचा विक्रमी दर कोरोनामुळे देशभर अंड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. या काळात कोविड सेंटरमध्येही अंडी खाण्याचा सल्ला दिला जात असल्याने अंड्यांचा खप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच नागरिकांची आरोग्यप्रती असलेली जागरूकता वाढल्याने प्रोटीनयुक्त आहार घेण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. त्याचाही चांगला परिणाम अंड्यांच्या मागणीवर झाला आहे. त्यामुळेच बाजारात अंड्यांचे भाव अचानक वाढल्याचे अनेक विक्रेत्यांनी सांगितले.
दिवसाला 75 हजारांपेक्षा अधिक अंड्यांची विक्री
जळगाव शहरात सध्या अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरात 10 होलसेलची दुकाने आहेत. या दुकानातून दिवसाला सुमारे 75 हजारांहून अधिक अंड्यांची विक्री होत आहे. यात शहर व आजूबाजूच्या खेड्यांसह अनेक तालुक्यांमध्येही जळगावातून माल जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनी चिकन खाणे बंद केल्याने पोल्ट्री उद्ध्वस्त झाल्या. मात्र, आता अनेक कोरोना सेंटरमधून अंडी खाण्याचा सल्ला दिला जात असल्याने व पोल्ट्री उद्ध्वस्त झाल्याने मागणी व पुरवठयात दरी निर्माण झाली. या दरीमुळे अंड्यांना विक्रमी भाव मिळत आहे. हा भाव 200 रुपये प्रती ट्रे पर्यंत (30 अंडी) जाण्याचा अंदाज आहे.
अशी आहे जळगावात स्थिती
शहरातून दिवसाला 75 हजार अंड्यांची विक्री होत आहे. किरकोळ विक्रीत अंड्याला 7 रुपये तर होलसेल विक्रीत 6 रुपये दर मिळत आहे. सद्यस्थितीत अंड्यांचा एक ट्रे 175 ते 180 रुपयाला मिळतो. पुढील आठवड्यात हाच ट्रे 200 रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धुळे, मालेगाव, नवापूर, जालना, बुलडाणा, हैदराबाद येथून जळगाव येथे मालाची आवक होत असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.
हेही वाचा -दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा 'रिकव्हरी रेट' 75 टक्क्यांवर