जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने जोरदार दणका दिल्याचे बोलले जात आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणीईडीने खडसेंची लोणावळा आणि जळगावातील सुमारे 5 कोटींची मालमत्ता जप्त केलीआहे. मात्र, जळगावातील नेमकी कोणती मालमता जप्त झाली आहे, याची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे खडसेंवर झालेल्या कारवाईबद्दल एकच चर्चा रंगली आहे.
नक्की कोणती मालमत्ता जप्त?
भोसरी एमआयडीसीतील भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून खडसे व त्यांच्या कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने चौकशीचे समन्स बजावले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव मंदाकिनी खडसेंनी वेळ मागून घेतला आहे. दुसरीकडे, स्वतः खडसेंची या प्रकरणात दोनवेळा चौकशी झाली आहे. यातच आज ईडीने खडसेंची लोणावळा आणि जळगावातील सुमारे 5 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने देखील याबाबतचे वृत्त दिले आहे. पण ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेपैकी जळगावातील नेमक्या कोणत्या मालमत्तेचा समावेश आहे? याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही.