जळगाव- जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात एका किराणा दुकानातून टाटा मिठाचा तब्बल बनावट 20 टन साठा जप्त करण्यात आला आहे. या साठ्याची किंमत सुमारे 4 लाख रूपये आहे. चाळीसगाव शहर पोलीस व टाटा सॉल्ट कंपनीने नेमलेल्या तपास पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली.
चाळीसगावात मिठात 'माती'; टाटा मिठाचा बनावट 20 टन साठा जप्त - जळगाव
चाळीसगाव शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या शुभम किराणा या दुकानात टाटा सॉल्ट कंपनीच्या नावाचा वापर करून बनावट मीठ विकले जात असल्याची माहिती टाटा सॉल्ट कंपनीला मिळाली होती. त्यानुसार कंपनीचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक मोहम्मद हुसेन, त्यांचे सहकारी लक्ष्मण विश्वकर्मा, अनुप कोलप व अनिल मोरे यांनी सोमवारी दुपारी शुभम किराणा दुकानावर छापा टाकला.
चाळीसगाव शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या शुभम किराणा या दुकानात टाटा सॉल्ट कंपनीच्या नावाचा वापर करून बनावट मीठ विकले जात असल्याची माहिती टाटा सॉल्ट कंपनीला मिळाली होती. त्यानुसार कंपनीचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक मोहम्मद हुसेन, त्यांचे सहकारी लक्ष्मण विश्वकर्मा, अनुप कोलप व अनिल मोरे यांनी सोमवारी दुपारी शुभम किराणा दुकानावर छापा टाकला. त्यात या दुकानावर टाटा कंपनीच्या नावाने बनावट मिठाची विक्री होत असल्याचे समोर आले. मिठाच्या पाकिटावरील डिझाईन व प्रिटींगवरील रंगात किंचितसा बदल केला असल्याचे आढळून आले. त्यावरून हे मीठ टाटा सॉल्ट कंपनीचे ब्रॅन्ड नसलेले मीठ असल्याचे खात्री झाली.
तपासणी करणाऱ्या पथकातील अधिकाऱ्यांनी दुकानदार विनोद पारसमल कोठारी याला सोबत घेत गोदामाच्या बाहेर असलेल्या मिठाच्या गोण्या तपासल्या असता त्यांच्यामध्ये व टाटा सॉल्ट कंपनीच्या मिठाच्या पाकिटांमध्ये तफावत आढळून आली. तेथे तपास पथकाला 4 लाख रूपये किंमतीचा 20 टन टाटा मिठाचा बनावट साठा मिळून आला. याप्रकरणी टाटा कंपनीचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक मोहम्मद हुसेन यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.