महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुष्काळाचा फटका : जळगाव जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवड क्षेत्र घटणार

जळगाव जिल्ह्यात यावर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने पूर्वहंगामी कापूस लागवड मोठ्या प्रमाणात घटणार आहे.

By

Published : Jun 2, 2019, 11:06 AM IST

पूर्वहंगामी कापूस लागवड करताना

जळगाव- जिल्ह्यात यावर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने पूर्वहंगामी कापूस लागवड मोठ्या प्रमाणात घटणार आहे. यापूर्वी जळगाव जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे ७० ते ८० हजार हेक्टरवर पूर्वहंगामी कापसाची लागवड होत होती. परंतु, दुष्काळामुळे यावर्षी अवघ्या १५ ते २० हजार हेक्टरवरच लागवडीचा कृषी विभागाचा अंदाज आहे. पाऊस लांबण्याची चिन्हे असल्याने त्यात अजून घट होण्याची शक्यता आहे.

माहिती देताना शेतकरी


जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात सुमारे पाच लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते. सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान आल्यानंतर जळगाव जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. खरीप हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी साधारणपणे मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पूर्वहंगामी कापूस लागवड होऊ लागली. दरवर्षी साधारणपणे ७० ते ८० हजार हेक्टरवर ही लागवड होत असे. परंतु, गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे आता विहिरी, कूपनलिकांना पाणी नाही. पाण्याअभावी पूर्वहंगामी कापूस लागवडीवर परिणाम झाला आहे. यावेळी अवघ्या १५ ते २० हजार हेक्टरवर लागवड होईल, अशी अपेक्षा आहे.


शेती तर सोडाच पणी पिण्यासाठीदेखील पाणी मिळत नसल्याची स्थिती असल्याने इच्छा असूनही शेतकरी पूर्वहंगामी कापूस लागवड करू शकत नाही. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी, कूपनलिकांना थोडेफार पाणी आहे, तेच लागवडीची हिंमत करत आहेत. शेतकऱ्यांच्या हाती पैसा नाही, त्यातच पाऊस लांबण्याची चिन्हे असल्याने व्याजाने पैसा काढून महागडी खते व बियाणे घेण्यास शेतकरी उत्सूक नाहीत.

जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या अळीचा नायनाट व्हावा म्हणून कृषी विभागाने यावर्षी मे ऐवजी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पूर्वहंगामी कापसाची लागवड करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. कापूस बियाणे शेतकऱ्यांना थेट जूनमध्येच उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनादेखील बियाणे कंपन्यांना देण्यात आल्या होत्या. आता जळगाव जिल्ह्यासाठी सुमारे १० लाख पाकीटे बीटी कापूस बियाणे तसेच ४५ ते ५० मेट्रिक टन संयुक्त व रासायनिक खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तापी नदीकाठावरील यावल, रावेर, चोपडा, जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर तसेच गिरणा नदीकाठावरील भडगाव, पाचोरा आणि चाळीसगाव तालुक्यातील गावांमध्ये पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू आहे.


पूर्वहंगामी कापूस लागवड केल्याने कापसाचे उत्पन्न लवकर आणि चांगले मिळते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा पूर्वहंगामी कापूस लागवडीकडे कल असतो. परंतु, यावर्षी दुष्काळामुळे शेतकरी इच्छा असूनही लागवड करू शकत नाही. जून महिना सुरू झाला तरी पावसाच्या आगमनाची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा धीर सुटत चालला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details