जळगाव - पोलीस हे जनतेचे रक्षक आहेत. मात्र, काही गैरसमजातून पोलीस आणि जनतेत दरी निर्माण होते. चुकीच्या गोष्टींमुळे सर्वसामान्य नागरिक पोलिसांपर्यंत तक्रार करण्यास धजावत नाही. ही परिस्थिती बदलण्याचा आपला प्रयत्न असेल. जोपर्यंत पोलीस आणि जनतेतील दरी दूर होत नाही तोपर्यंत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणार नाही. यापुढे पोलीस आणि जनतेतील दरी दूर करणार असल्याचा मनोदय नवनियुक्त पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी व्यक्त केला.
डॉ. प्रवीण मुंडे यांनी मंगळवारी दुपारी मावळते पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याकडून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सचिन गोरे, सहायक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन उपस्थित होते. सुरुवातीला मावळते पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती आणि गुन्हेगारी विषयीची माहिती डॉ. मुंढे यांना दिली. त्यानंतर कार्यालयीन पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्याकडे पदभार सोपवला.