जळगाव - कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. या संकटाच्या काळात किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन आदिवासी बांधवांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. किनगावपासून ८५ किमी अंतरावर सातपुड्याच्या दुर्गम भागात सग्यादेव आणि माथान या दोन आदिवासी पाड्यांमध्ये, पायी जाऊन त्यांनी आदिवासींची नुकतीच आरोग्य तपासणी केली. या वेळी स्वयंसेवी संस्था निरभ्र निर्भय फाउंडेशनचे पदाधिकारी व आरोग्य विभागाचे पथक त्यांच्यासोबत होते.
डॉ. महाजन यांच्या रुपाने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७३ वर्षांत पहिल्यांदाच या पाड्यांवरील रहिवाशांनी डॉक्टर पाहिला. सग्यादेव आणि माथान हे आदिवासी पाडे सातपुडा पर्वतातील अत्यंत दुर्गम भागात आहेत. तेथे जाण्यासाठी पर्वतराजीतून पायपीट करत जावे लागते. सोबतीला घनदाट जंगल व वन्यप्राण्यांची भीती असते. मात्र, कोरोनाच्या संकटात या पाड्यांवर आरोग्य सेवा पोहोचणे गरजेचे होते. त्यामुळे निश्चय करून डॉ.महाजन यांनी सग्यादेव येथे जाण्याचा निर्णय घेतला. सातपुडा पर्वत रागांमधून प्रवास करत रुईखेडापर्यंत त्या दुचाकीने गेल्या. पुढील १० किमीचा पायी प्रवास अधिक खडतर होता. अरुंद पायवाटेने भर उन्हात जंगलातून जाताना त्यांच्याकडे औषधांची बॅग होती.