जळगाव-शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू आहे. परंतु, अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या 'पीपीई' किटचा साठा संपला असल्याची धक्कादायक माहिती समोरी आली आहे. दरम्यान, त्याला पर्याय म्हणून 'एचआयव्ही' किटची मदत घेत कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व वैद्यकीय सहाय्यकांनी पीपीई किटचा वापर करणे आवश्यक आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १० पीपीई किट उपलब्ध होते. ते गेल्या ८ दिवसात संपले आहेत, त्यामुळे त्याला पर्याय असलेल्या एचआयव्ही किटवर काम भागवले जात आहे. वैद्यकीय महाविद्यालय व शाहू रुग्णालयात एक पॉझिटिव्ह रुग्ण व ३६ कोरोना संशयित भरती आहेत. तर प्रतिबंधात्मक उपायासाठी ३३२ सॅनिटायझर, ३४३ एन-९५ मास्क, ३०० एचआयव्ही किट उपलब्ध असल्याची माहिती महाविद्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.