महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव : भाजपच्या बंडखोर नगरसेवकांच्या अडचणी वाढणार; विभागीय आयुक्तांनी बजावल्या अपात्रतेच्या नोटिसा - Divisional Commissioner issues disqualification notices

महापालिकेतील भाजपच्या 27 बंडखोर नगरसेवकांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. विभागीय आयुक्तांनी त्यांना अपात्रतेच्या नोटिसा बजावल्या आहेत.

Jalgaon Corporation
जळगाव पालिका

By

Published : Jul 7, 2021, 9:38 PM IST

जळगाव -महापालिकेतील भाजपच्या 27 बंडखोर नगरसेवकांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. मार्च महिन्यात झालेल्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीवेळी भाजपचा व्हीप झुगारून या बंडखोरांनी शिवसेनेच्या बाजूने मतदान केले होते. त्यामुळे स्पष्ट बहुमत असतानाही भाजपच्या हातून सत्ता जात शिवसेनेचा महापौर झाला होता. या प्रकारानंतर भाजपने बंडखोरांना अपात्र करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्या अनुषंगाने आता विभागीय आयुक्तांनी संबंधित नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा बजावल्या असून, 7 दिवसात म्हणणे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. म्हणणे सादर केले नाही तर एकतर्फी निर्णय घेऊन कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • 30 हजार पानांचा दाखल केला होता प्रस्ताव-

बंडखोर नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी भाजपकडून गटनेते भगत बालाणी यांनी विभागीय आयुक्तांकडे मार्च महिन्यातच 30 हजार पानांचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर 3 महिन्यांनी विभागीय आयुक्तांनी संबंधित नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसा महापालिका आयुक्तांना प्राप्त झाल्या असून, त्या लवकरच नगरसेवकांना बजावल्या जाणार आहेत. नगरसेवकांनी नोटिसा स्वीकारल्या नाहीत तर त्या नगरसेवकांच्या घरच्या पत्त्यावर पाठवल्या जातील, अशी सूत्रांची माहिती आहे.

  • बंडखोरांनीही केली कायदेशीर तयारी-

अपात्रतेबाबतच्या नोटिसा महापालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर बंडखोर 27 नगरसेवक देखील कायदेशीर पडताळणीच्या कामाला लागले आहेत. या नगरसेवकांनी बुधवारी काही विधिज्ज्ञांसोबत चर्चा करून, पुढील प्रक्रियेबाबतची माहिती जाणून घेतली. तसेच विभागीय आयुक्तांच्या नोटिसीला काय उत्तर द्यावे, याबाबत विधिज्ज्ञांचा सल्ला घेतला.

दरम्यान, महापालिकेच्या राजकारणाची समीकरणे बदलणाऱ्या नगरसेवकांच्या बाबतीत पुढे काय घडते? याची उत्सुकता लागली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details