महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपामध्ये रंगणार सामना; निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू - जळगाव जिल्हा बॅंक निवडणूक

राज्यातील जिल्हा बँकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश काढले आहेत. हे आदेश निघताच जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली असून, इच्छुकांच्या बैठका वाढल्या आहेत.

जळगाव
जळगाव

By

Published : Aug 17, 2021, 8:52 PM IST

जळगाव -कोरोनामुळे तब्बल दीड वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने सहकार व पणन मंत्रालयाने, राज्यातील जिल्हा बँकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश काढले आहेत. हे आदेश निघताच जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली असून, इच्छुकांच्या बैठका वाढल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पाहता यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा थेट सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. असे असले तरी ऐनवेळी नेत्यांमध्ये वाटाघाटी यशस्वी झाल्या तर मात्र, सर्वपक्षीय पॅनल सत्तारूढ होऊ शकते.

जून 2020 मध्ये संपली संचालक मंडळाची मुदत

जळगाव जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत जून 2020 मध्ये संपली. त्यानंतर कोरोनामुळे निवडणूक प्रक्रिया झाली नाही. आता कोरोना आटोक्यात आल्याने सहकार व पणन मंत्रालयाने जिल्हा बँकांच्या निवडणुका घेण्याचे ठरवले आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी ही निवडणूक घेण्याचे प्रयत्न असल्याने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, नेतेमंडळी जुळवाजुळव करण्यात गुंतले आहेत. या निवडणुकीसाठी सप्टेंबर महिन्यात मतदार यादी जाहीर करून त्यावर हरकती मागवणे, अंतिम मतदार यादी निश्चित करून ऑक्टोबर महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. या साऱ्या प्रक्रियेला थोडाच अवधी शिल्लक असल्याने नेतेमंडळीने पायाला भिंगरी बांधली आहे.

जिल्ह्याच्या राजकारणाने बदलली कूस, निवडणुकीवर थेट परिणाम होणार?

गेल्या 5 वर्षांच्या काळाचा विचार केला तर जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणाने कूस बदलली असून, त्याचा थेट परिणाम जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. 2015 मध्ये झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी माजीमंत्री एकनाथ खडसे हे भाजपात होते. तेव्हा त्यांच्याकडे निवडणुकीची सर्व सूत्रे होती. त्यांनी सर्वपक्षीयांना एकत्र आणून एकमुखी निर्णय घेत निवडणूक बिनविरोध केली होती. आता खडसे भाजपा सोडून राष्ट्रवादीत आले आहेत. त्यांना काही बाबतीत निर्णय घेण्यात मर्यादा आहेत. खडसेंच्या सोडचिठ्ठीनंतर भाजपाचे जिल्ह्यातील नेतृत्व हे माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या हाती आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत खरी लढत ही खडसे विरुद्ध महाजन अशीच होण्याची शक्यता आहे.

राज्यातील सत्तेचा शिवसेना फायदा करून घेणार?

जळगाव जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा वरचष्मा राहिल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मात्र, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवल्यानंतर भाजपाने सहकार क्षेत्राकडे मोर्चा वळवला. जिल्ह्यात भाजपाने जिल्हा बँक, दूध संघासह विविध बाजार समित्यांची सत्ता काबीज केली. त्यावेळी राज्यातील सत्तेचा भाजपाला फायदा झाला. आता शिवसेना भाजपाच्याच पावलावर पाऊल टाकत आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे सर्वाधिक आमदार आहेत. राज्याच्या सत्तेतही शिवसेना केंद्रस्थानी आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना सहकारात वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी सोडणार नाही, असे चित्र दिसत आहे. सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारण नसते. त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांचे मिळूनच पॅनल तयार होत असते. या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलसाठी सर्वांचा आग्रह दिसत असला तरी महाजन-खडसे एकत्र येणे शक्य नाही. त्यामुळे आताची निवडणूक चुरशीची होणार हे मात्र नक्की मानले जात आहे.

खडसे निर्णय प्रक्रियेत असतील?

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. हाच फॉर्म्युला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिसेल का? याबाबत मात्र साशंकता आहे. एकनाथ खडसेंच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील नेतेमंडळी दुखावली गेली आहे. वरवर ते खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा आनंद साजरा करत असले तरी त्यांना राष्ट्रवादीची जिल्ह्यातील सूत्रे खडसेंच्या हाती जाणे पसंत नाही. सध्या खडसे ईडीच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे ते जिल्ह्याच्या राजकारणापासून जरासे अलिप्त आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खडसेंना बाजूला ठेऊन निर्णय होऊ शकतात, असेही सांगितले जात आहे.

राष्ट्रवादी-सेनेचा असेल वरचष्मा

जिल्हा बँकेच्या आजवरच्या राजकीय इतिहासावर एक नजर टाकली तर जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांचा वरचष्मा राहिला आहे. गेल्या काळात भाजपाने राज्यात दबदबा निर्माण केल्यानंतर त्याची परिणिती जिल्हा बँकेत ही दिसून आली होती. खडसे यांच्या रुपाने जिल्हा बँकेत भाजपाने सर्वांना एकत्र आणून वर्चस्व प्रस्थापित केले होते. परंतु अलीकडच्या काळात जिल्ह्यातील बदललेल्या राजकारणामुळे आता जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वरचष्मा असेल असे चित्र आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे स्वतः त्यासाठी प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजीमंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील ही मंडळी मातब्बर मानली जातात. त्यामुळे भाजप दुय्यम स्थानी असेल. असाही आडाखा बांधला जात आहे.

हेही वाचा -धर्मगुरुंविरोधात आक्षेपार्ह विधानाचा निषेध; समाजवादी पार्टीचे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details