जळगाव -विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी जळगावात आलेल्या राज्य शासनाच्या विधीमंडळ अंदाज समितीने महापालिका प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत सुरू असलेले पाणीपुरवठा योजनेचे काम, भुयारी गटार योजना, घनकचरा प्रकल्प अशा योजनांची अंमलबजावणी करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाल्याने, अंदाज समिती सदस्यांनी आढावा बैठकीत महापालिका आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले. जनतेच्या करातील रकमेचा अपव्यय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
राज्य शासनाच्या विधीमंडळ अंदाज समितीने मंगळवारपासून विविध योजनांचा आढावा घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. या अंदाज समितीत ३० आमदारांचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात समिती अध्यक्ष आमदार रणजित कांबळे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत महापालिकेअंतर्गत सुरू असलेल्या विविध योजनांबाबत आढावा घेण्यात आला. यामध्ये घनकचरा प्रकल्प, भुयारी गटार योजना व अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेतील वॉटर मीटरच्या निविदांमध्ये झालेल्या घोळबाबत समिती सदस्यांनी आयुक्तांना विविध प्रश्न करत धारेवर धरले.
'रस्ते फोडणाऱ्या ठेकेदारावर दुरुस्तीची जबाबदारी का नाही?'