महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात राष्ट्रवादीच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्षांसमोरच गटबाजीचे दर्शन; बॅनरवरील फोटोंच्या मुद्द्यावरून नेत्यांमध्ये रंगले नाराजीनाट्य - jalgaon ncp president jayant patil

राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेदरम्यान जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात शनिवारी दुपारी जळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत हा प्रकार घडला.

dispute on banner photos in ncp state president meeting in jalgaon
राष्ट्रवादीच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्षांसमोरच गटबाजीचे दर्शन

By

Published : Feb 13, 2021, 9:14 PM IST

Updated : Feb 13, 2021, 10:25 PM IST

जळगाव -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोरच जाहीर मेळाव्यात जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली. कार्यक्रमाच्या बॅनरवर जाणीवपूर्वक फोटो डावलल्याच्या मुद्द्यावरून नेत्यांमध्ये नाराजी नाट्य रंगले. हा प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद होत असल्याचे जयंत पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी संतापात हातवारे करत नेत्यांना खाली बसण्याच्या सूचना केली. दरम्यान, कालच (शुक्रवारी) जयंत पाटलांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर माजीमंत्री एकनाथ खडसे यांचा फोटो न लावल्याच्या कारणावरून गटबाजीचे वादळ उठले होते. त्यावर पडदा पडून काही तास उलटत नाही; तोच पुन्हा बॅनरवरील 'फोटो'ची नाराजी उफाळून आली. विशेष म्हणजे, दोन्ही प्रकारात माजीमंत्री गुलाबराव देवकर केंद्रस्थानी राहिले.

याबाबत स्थानिक नेत्यांची प्रतिक्रिया.

राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेदरम्यान जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात शनिवारी दुपारी जळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत हा प्रकार घडला. बैठकीत जाहीर भाषणात बॅनरवरील फोटोवरून माजी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी माजीमंत्री गुलाबराव देवकरांबाबत नाराजी प्रकट केली. इतकेच नव्हे तर, नेत्यांमधील मतभेद मिटवा, एकमेकांमध्ये मनभेद असल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा प्रभाव ओसरला आहे, असे त्यांनी सांगितल्याने राष्ट्रवादीमधील गटबाजी प्रदेशाध्यक्षांसमोरच चव्हाट्यावर आली.

हेही वाचा -..तर निश्चितच कारवाई होईल; पण ठाम पुराव्याशिवाय कोणाचे नाव घेणे चुकीचे

नेमकं काय घडलं?

या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगाव शहर व ग्रामीण मतदारसंघातील पक्ष संघटनेचा आढावा घेतला. त्यांनी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांकडून कार्यकारिणीची माहिती जाणून घेतली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना धरणगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी जळगाव ग्रामीण विभागात सुरुवातीला राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. मात्र, नेत्यांमध्ये मतभेद झाल्याने पक्षाची ताकद कमी झाल्याची माहिती दिली. तसेच माजीमंत्री गुलाबराव देवकरांकडे अंगुलीनिर्देश करत व्यासपीठावरील फलकावर देखील आमचे फोटो लावले नसल्याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली. नेत्यांना मतभेद मिटविण्यास सांगा, अशी सूचनाही त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे केली. ज्ञानेश्वर महाजन बोलत असताना गुलाबराव देवकर यांनी थेट माईकचा ताबा घेतला. 'अशा छोट्या छोट्या विषयांवरुन नाराजी व्यक्त करू नका, धरणगाव तालुक्यात मी माझ्या खर्चाने लावलेल्या फलकांवर तुमचा फोटो लावला' असे देवकरांनी यावेळी सांगितले. दोन्ही नेते एकमेकांचे खुलासे करत असल्याने गोंधळ झाल्याचे पाहून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त करत नेत्यांना शांत बसण्यास सांगितले.

यांची होती उपस्थिती -

यावेळी व्यासपीठावर मंत्री जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष अ‌ॅड. रवींद्र पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजीमंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, माजी आमदार मनीष जैन, संतोष चौधरी, दिलीप वाघ, आमदार अनिल पाटील, अ‌ॅड. रोहिणी खडसे, ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Last Updated : Feb 13, 2021, 10:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details