जळगाव - शहरातील तांबापुरा भागात दोन गटात हाणामारी होऊन तुफान दगडफेक झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे अनर्थ टळला. याप्रकरणी पोलिसांनी चार ते पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी मध्यरात्री तरुण एकट्या असलेल्या महिलेच्या घरात शिरला होता. याच कारणावरुन वाद झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोलासिंग बावरी हा मद्याच्या नशेत शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता रवींद्र बाबुराव हटकर यांच्या घरात घुसला होता. त्यामुळे रात्री घरात एकटी असलेली महिला प्रचंड घाबरली होती. महिलेने आरडा-ओरड केल्यामुळे शेजारी लोकांची गर्दी झाली होती. हे पाहून भोलासिंग हा पळून गेला होता. यानंतर शनिवारी सकाळी भोलासिंग गल्लीतून जात असताना महिलांनी त्याला जाब विचारला. याचा राग आल्याने भोलासिंग याने दगडफेक केली. त्यानंतर बावरी आणि हटकर गट आमनेसामने आल्याने वाद वाढला. हाणामारी होऊन तुफान दगडफेक झाली. त्यात भोलासिंग बावरी, जगजितसिंग बावरी व उखा हटकर हे तीन जण जखमी झाले.