जळगाव -महापौर भारती सोनवणे यांचे पती तथा स्विकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी महापालिकेचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांना अश्लिल शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १७ मार्च रोजी सकाळी (६.४५ वाजता) शहरातील टी. बी. सॅनिटोरीयमजवळ हा प्रकार घडला असून, याबाबत उपायुक्त दंडवते यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा -अल्पबचत योजनांवरील व्याजदर आगामी तिमाहीत कमी होण्याची शक्यता
शहरात वॉटरग्रेस या कंपनीला साफसफाईचा मक्ता देण्यात आला आहे. दरम्यान, कंपनीच्या कामाबाबत अनेक तक्रारी असल्यामुळे महापालिका सभागृहात सत्ताधारी, विरोधकांमध्येही वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने ‘वॉटरग्रेस’चे काम बंद केले होते. सर्व वाहनेही ताब्यात घेतली होती. यानंतर पुन्हा या कंपनीस अटींची पूर्तता करुन काम सुरु करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या हाेत्या. असे असतानाही वॉटरग्रेसचा मक्ता रद्द करण्यासाठी एक गट तर कायम ठेवण्यासाठी दुसरा गट असे दोन गट महापालिकेत सक्रिय झाले आहेत.
नवनिर्वाचित महापौर भारती सोनवणे यांचे पती कैलास सोनवणे यांनी १६ मार्च रोजी रात्री ९ वाजता उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांना मोबाईलवर फोन करुन वॉटरग्रेस कंपनीचे काम सुरू होणार आहे का? याबाबत विचारणा केली. दंडवते यांनी हाेकार दिल्यानंतर सोनवणेंनी त्यांना सकाळी टी. बी. सॅनिटोरीयम येथे वाहनतळावर येण्याचे सांगितले. त्यानुसार १७ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजता दंडवते हे घंटागाड्यांच्या नियोजनासाठी तेथे पोहाचले. यावेळी त्यांच्यासोबत सहाय्यक आयुक्त पवन पाटील, आकाश डोईफोडे आदी हजर होते. तसेच महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा, स्विकृत सदस्य कैलास सोनवणे इतर दोन-तीन नगरसेवक व पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, बांधकाम ठेकेदार, वाहनचालक तेथे आले होते.
कैलास सोनवणे यांनी भारती सोनवणे व शुचिता हाडा यांना बाजुला उभे राहण्यास सांगितले. त्या बाजुला गेल्यानंतर सोनवणे यांनी थेट दंडवते यांना अश्लिल शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच मारहाण करण्याची धमकी दिली. सरकारी कामात अडथळा देखील निर्माण केला. हा प्रकार दंडवते यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांना सांगितला. यानंतर १७ रोजी रात्री दंडवते यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार कैलास सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महापौर पतींनी थेट उपायुक्तांना शिवीगाळ करत धमकी दिल्याने महापालिकेचे वातावरण तापले आहे. या प्रकरणी प्रशासन आता काय भूमिका घेते? याकडे लक्ष लागले आहे.