जळगाव - जिल्हा नियोजन समितीची बैठक जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यात झालेल्या खडाजंगीमुळे चांगलीच गाजली. आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून येण्याच्या मुद्यावरून दोघांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देत चिमटे काढले.
जिल्हा नियोजन समितीची चालू पंचवार्षिकची शेवटची बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी पार पडली. महाजन आणि पाटील यांच्यातील शाब्दिक वादामुळे ही बैठक गाजली. बैठक सुरू असताना गिरीश महाजनांनी सतीश पाटलांना उद्देशून 'त्यांची शेवटची बैठक आहे', असा चिमटा काढल्याने ठिणगी पडली. त्यावर सतीश पाटलांनी आक्रमक पवित्रा घेत 'मी आगामी विधानसभा निवडणुकीत तुमच्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येऊन पुन्हा याच सभागृहात बसेन', असा पलटवार केला. महाजनांनी 'पहा बरं' असे सांगताच सतीश पाटील अधिक आक्रमक झाले. 'मागच्या निवडणुकीत मोदी लाट असताना मी खान्देशातून एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून निवडून आलो. आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील मी निवडून येईल. निवडून आलो नाही तर बापाचे नाव लावणार नाही. तुमच्यात हिंमत असेल तर निवडणूक ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. हे आव्हान सतीश पाटील देतोय, नाना पटोलेंचं हे आव्हान नाही, असा चिमटा देखील काढण्याची संधी सतीश पाटलांनी दवडली नाही.