जळगाव -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे सध्या त्यांनी मिळवलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रामुळे चर्चेत आहेत. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या दिव्यांग मंडळाने त्यांना 60 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र इश्यू केले आहे. खडसेंच्या याच अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर निरनिराळ्या प्रकारचे आक्षेप घेतले जात आहेत. या विषयासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे यांनी, वैद्यकीय तपासण्यांच्या आधारेच खडसेंना अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिल्याचा दावा केला आहे.
गिरीश महाजन यांनी घेतला होता सुरुवातीला आक्षेप -
एकनाथ खडसे यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर सर्वात आधी भाजप नेते गिरीश महाजन यांनी आक्षेप घेतला होता. खडसेंना 60 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे मिळाले? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी या प्रकारच्या सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर खडसेंचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनीही खडसेंच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला आहे.
काय म्हणाले डॉ. मारोती पोटे? -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी एकनाथ खडसे यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दिव्यांग मंडळाच्या तज्ञ डॉक्टरांनी एकनाथ खडसे यांना त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्यांच्या अहवालांच्या आधारेच 60 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यासाठी खडसेंनी स्वतः दिव्यांग मंडळात तपासणीसाठी हजेरी लावून त्यांच्याकडे असलेले तपासणी अहवाल सादर केले. त्याची प्रत्यक्ष पडताळणी करून दिव्यांग मंडळाच्या डॉक्टरांनी त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र इश्यू केले आहे, अशी माहिती डॉ. पोटे यांनी दिली आहे.