जळगाव- 'आगामी विधानसभा निवडणूक आपल्यासाठी प्रतिष्ठेची आहे. ही बाब प्रत्येक कार्यकर्त्याने लक्षात घ्यावी. आपापसातील मतभेद विसरून पक्ष हितासाठी कामाला लागा. आपणच आपले शत्रू नाहीत, हे ओळखा. आपले खरे शत्रू भाजप आणि शिवसेना आहे,' असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हा प्रभारी तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी आज जळगावात केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील 11 जागांसाठी इच्छुक उमदेवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. शहरातील आकाशवाणी चौकात असलेल्या पक्ष कार्यालयात मुलाखतीची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
जिल्हाभरातून 47 इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे आले होते. दिलीप वळसे पाटील यांच्यासह पक्ष निरीक्षक रंगनाथ काळे, करण खलाटे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक आदींच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. या मुलाखतींचा अहवाल प्रदेशस्तरावर सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार उमेदवारीचा निर्णय होईल.
'लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता विधानसभा निवडणूक आपल्यासाठी प्रतिष्ठेची आहे. कधीकाळी जळगाव जिल्ह्यात आपले 5 ते 6 आमदार असायचे. हेच वैभव आपल्याला पुन्हा एकदा पक्षाला प्राप्त करून द्यायचे आहे. त्यासाठी गटबाजी, मतभेद विसरून कामाला लागा. उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे शिष्टमंडळ आणायची गरज नाही. पक्ष जो आदेश देईल तो सर्वांना शिरसावंद्य असेल. पक्षाने दिलेल्या आदेशाविरोधात खासगीत किंवा प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त होणे खपवून घेतले जाणार नाही. विधानसभा निवडणूक आपण मित्रपक्ष असलेल्या काँग्रेससोबत आघाडीच्या माध्यमातून लढवणार आहोत. किती जागा आपण, किती जागा मित्रपक्ष लढवेल, हे पक्षश्रेष्ठी ठरवतील,' असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.