जळगाव -शहराची खंडित झालेली विमानसेवा ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यासाठी ट्रू-जेट कंपनीतर्फे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या महिन्यात कंपनीच्या डीजीसीएच्या परवानग्यांचा विषय प्रलंबित होता. आता या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. यामुळे जळगाव ते मुंबई विमानसेवा येत्या १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
जळगाव ते मुंबई रखडलेली विमानसेवा १ ऑगस्टपासून सुरू होणार ट्रू-जेट कंपनीला विमानसेवेसाठी डीजीसीएकडून परवानगी
हैद्राबादच्या ट्रू-जेट कंपनीला जळगावातून विमानसेवा देण्याची परवानगी देण्यात आली होती. ट्रू-जेट कंपनीकडून 'अहमदाबाद ते जळगाव' व 'जळगाव ते मुंबई' या दोन ठिकाणी विमानसेवा देणार आहे, परंतु ट्रू-जेटला नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) काही परवानग्या न मिळाल्याने विमानसेवा सुरू करता येत नव्हती. अखेर ऑगस्ट महिन्यातच विमानसेवा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. डीजीसीएच्या मुंबईतील बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी जळगावच्या विमान फेऱ्यांबाबतही चर्चा केली होती.
कंपनीतर्फे विमानतळावर आवश्यक संगणकीय यंत्रणेचे काम पूर्ण
ट्रू-जेटने विमानतळावर संगणक कक्ष तयार केला असून, प्रशिक्षण घेतलेले विमानतळ व्यवस्थापक लवकरच जळगावात दाखल होणार आहेत. विमानात सामानाची चढ-उतार करणारा लोडर-अनलोडर स्टाफ या आधीच दाखल झाला आहे. विमानतळावर आवश्यक त्या सुविधादेखील करण्यात येत आहे. त्यामुळे विमानसेवा १ ऑगस्टपासूनच सुरू करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
खासदार उन्मेष पाटील यांचा विमानसेवेबद्दल संसदेत तारांकित
जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी विमानसेवेबद्दल संसदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. नागरी उड्डान मंत्री आर.के. पुरी यांनी जळगावच्या विमानसेवेसाठी ट्रू-जेट कंपनीला अहमदाबाद व मुंबई विमानतळावर पार्किंगची सुविधा देण्याबाबत व टायमिंग स्लॉट मिळण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात येतील, असेही आश्वासन दिले होते.
जळगावहून पुण्यासाठी दररोज दोन ते अडीच हजार विद्यार्थी, उद्योजक प्रवास करतात. त्यांना विमानसेवेची गरज असल्याने लवकरच मुंबई-पुणे-जळगाव या विमानसेवेची निविदा काढण्यात येणार आहे.