जळगाव -बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहाराचे प्रकरण राज्यभर गाजत आहे. अशातच भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथेही माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या नावे असलेल्या 'एकनाथराव खडसे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थे'च्या गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. या पतसंस्थेच्या दामदुप्पट मुदत ठेव योजनेत पैसे गुंतवलेल्या दोन ठेवीदारांनी, आपल्याला ठेवीची मुदत पूर्ण होऊन एक रुपयाही मिळाला नसल्याचा आरोप शनिवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, ही पतसंस्था एकनाथ खडसे यांच्या नावाने असली तरी खडसे यांचा तिच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ते पतसंस्थेच्या संचालक मंडळातही नसल्याची माहिती समोर आली आहे.
वरणगाव येथील एकनाथराव खडसे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या दामदुप्पट मुदत ठेव योजनेत, भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील यादव जगन्नाथ पाटील आणि वरणगाव येथील प्रकाश रघुनाथ चौधरी यांनी आपले पैसे गुंतवले होते. मात्र, मुदत ठेव योजनेचा कालावधी पूर्ण होऊनही त्यांना दामदुप्पट तर नाही; पण मुद्दल रक्कमही परत मिळाली नाही. त्यांनी आपले हक्काचे पैसे मिळावेत म्हणून पतसंस्थेच्या पायऱ्या झिजवल्या पण, उपयोग झाला नाही. शेवटी आता त्यांनी जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे त्यांच्याकडे मांडले. गुप्ता यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा विषय शनिवारी प्रसारमाध्यमांसमोर मांडला. बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी यादव पाटील व प्रकाश चौधरी यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी गुप्ता यांनी केली. दरम्यान, पाटील व चौधरी यांच्यासह शेकडो ठेवीदारांचे पैसे पटसंस्थेकडे अडकले आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?