जळगाव -जिल्ह्यात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबलेल्या पावसामुळे सर्वत्र डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे डेंग्यू अधिक पाय पसरत आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण वाढले असून डेंग्यूसदृश्य रुग्णांची संख्या तब्बल पाचशेच्या वर गेली आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांमध्ये डेंग्यूसदृश्य रुग्ण अधिक पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा... अरविंद सावंत यांनी दिला केंद्रीय अवजड मंत्रिपदाचा राजीनामा
जळगाव जिल्ह्यात पाचशेच्या वर डेंग्यूसदृश्य रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यापैकी सुमारे सव्वाशेपेक्षा अधिक रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात डेंग्यूसदृश्य रुग्णांची संख्या सुमारे अडीचशेच्या घरात होती. त्यानंतर ऑक्टोबरच्या अखेरीस अवकाळी पावसाची रिपरिप सुरू असल्याने डेंग्यूसदृश्य रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी स्वच्छ पाण्याची डबकी साचली आहेत. शिवाय सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढत आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायत तसेच शहरी भागात नगरपालिका आणि महापालिका प्रशासनाकडून डासांचा बंदोबस्त करण्यासाठी धुरळणी होत नसल्याने डेंग्यूचा फैलाव होत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र तसेच शहरी भागात नगरपालिका, महापालिका दवाखान्यांमध्ये डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण उपचार घेत आहेत. सरकारी रुग्णालयांप्रमाणेच खासगी रुग्णालयांमध्येही ही रुग्ण संख्या अधिक आहे.