जळगाव -जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असला तरी डेंग्यूच्या आजाराने थैमान घातल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यातून 50पेक्षा अधिक संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी 'एनआयव्ही'कडे पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे, खासगी रुग्णालयेदेखील डेंग्यूसदृश्य रुग्णांनी फुल्ल असल्याने आजाराची तीव्रता अधिक असण्याची शक्यता आहे.
दवाखाने रुग्णांच्या गर्दीने फुल्ल -
जिल्ह्यात डेंग्यूचे संकट उभे राहिले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत म्हणजेच, जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या काळात ठिकठिकाणी डेंग्यूच्या 30 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे, जळगाव महापालिका हद्दीत गेल्याच महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात डेंग्यू वेगाने हातपाय पसरत असल्याचे स्पष्ट झाले होते. जळगावात तब्बल 16 हजारांपेक्षा अधिक घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या होत्या. शहरासह जिल्ह्यात थंडी-तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर असून, दवाखाने रुग्णांच्या गर्दीने फुल्ल आहेत.
जिल्ह्यातील 130 अहवाल प्रलंबित -
प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. लांडे यांनी डेंग्यूच्या साथीविषयी 'ईटीव्ही भारत'ला माहिती देताना सांगितले की, जळगाव जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यांच्या कालावधीत डेंग्यू सदृश्य आजाराची लक्षणे असलेल्या एकूण 390 संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आलेले होते. त्यात 42 रुग्णांचे अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले. यात 260 नमुने हे ग्रामीण भागातील तर 130 नमुने हे शहरी भागातील होते. पॉझिटिव्ह आढळलेल्या 42 नमुन्यांमध्ये 29 नमुने ग्रामीण भागातील व 13 नमुने शहरी भागातील होते. सध्या डेंग्यूची लागण झालेले 7 रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 130 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, अशी माहिती डॉ. लांडे यांनी दिली.