जळगाव -धुळे येथील विशेष न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वी तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकुल घोटाळा खटल्याचा निकाल दिला. त्यात माजीमंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकरांसह महापालिकेचे तत्कालीन अधिकारी आणि नगरसेवक दोषी ठरले आहेत. दोषी ठरलेल्यांमध्ये आता महापालिकेत भाजपचे प्रतिनिधित्व करणारे पाच नगरसेवक देखील असून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र, कायदेशीर बाबींचे कारण पुढे करत महापालिका प्रशासनाकडून शिक्षा सुनावलेल्या नगरसेवकांवर कारवाईसाठी टाळाटाळ सुरू आहे.
हेही वाचा... ऑस्ट्रेलियातील जंगलांना आग : न्यू साउथ वेल्समध्ये आपात्काळ जाहीर, 600 शैक्षणिक संस्था बंद
जळगाव नगरपालिकेच्या घरकुल घोटाळ्यात दोन महिन्यांपूर्वी धुळे विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये भाजपचे गटनेते भगत बालाणी, नगरसेवक सदाशिव ढेकळे, दत्तात्रय कोळी, लता भोईटे आणि स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांचा समावेश आहे. घरकुल प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर या पाचही विद्यमान नगरसेवकांविरुद्ध काय कारवाई केली? याबाबतची सविस्तर माहिती जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी माहिती अधिकार अर्जाद्वारे महापालिका प्रशासनाकडे मागितली आहे. या विषयासंदर्भात दीपक गुप्ता यांचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर महापालिकेतील प्रशासकीय यंत्रणेसह महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. घरकुल घोटाळ्यात न्यायालयाचा निकाल येऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. मात्र, तरीही दोषी नगरसेवकांवर कारवाई न केल्याने प्रशासन संशयाच्या घेऱ्यात सापडले आहे.