जळगाव -जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार संजय सावकारे यांच्या नावे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने बनावट फेसबुक अकाऊंट उघडले. त्यानंतर त्यांच्या फ्रेंडलिस्टमधील लोकांकडून पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. या प्रकारानंतर आमदार सावकारे यांनी फेसबुककडे तक्रार करत संबंधित बनावट अकाऊंट डिलीट केले. दरम्यान, या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. जळगाव जिल्ह्यात यापूर्वी देखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट उघडल्याचे प्रकार घडले आहेत.
बनावट फेसबुक अकाउंट उघडून लोकांकडून मागितले पैसे -
सोशल मीडियाचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे सातत्याने निदर्शनास येत आहे. काही महाभागांनी तर सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म वापरून लोकांना आर्थिक गंडा घालण्याचे काम सुरू केले आहे. प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावे फेसबुकचे बनावट अकाउंट उघडून, त्यांच्या फ्रेंडलिस्टमधील लोकांकडून पैशांची मागणी केल्याचे प्रकार घडत आहेत. जळगाव जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत असा प्रकार घडला होता. आता लोकप्रतिनिधींच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट उघडण्याचा प्रकार समोर आला आहे. भुसावळचे भाजप आमदार संजय वामन सावकारे यांना अशाच एका प्रकारामुळे मनस्ताप सहन करावा लागला. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट उघडून त्यांच्या फ्रेंडलिस्टमधील लोकांकडून पैसे मागितले आहेत. हा प्रकार लक्षात येताच आमदार सावकारे यांनी फेसबुककडे तक्रार केली आणि संबंधित अकाउंट ब्लॉक केले.