जळगाव -जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे रविवारी मध्यरात्री ट्रक उलटून घडलेल्या भीषण अपघातात 15 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण जिल्हाच नव्हे, तर राज्य हळहळले. या अपघातामुळे रावेर तालुक्यातील आभोडा गावातील दीपिका आणि खुशीवर या दोघी चिमुरडींवर आभाळच कोसळले आहे. क्रूर नियतीने त्यांची आई कमलाबाई, बहीण शारदा आणि भाऊ गणेश या तिघांना हिरावून घेतले आहे. या घटनेने दोघी बहिणी अक्षरशः भेदरल्या आहेत.
दोन्ही बालिकांवर ओढवले मोठे संकट -
किनगावजवळ घडलेल्या अपघातात दीपिका आणि खुशी या दोन्ही बालिकांवर मोठे संकट ओढवले आहे. या अपघातात दोघांची आई, बहीण आणि भाऊ या तिघांचा मृत्यू झाला आहे. या दोघींचे वडील रमेश मोरे हे दोन वर्षांपूर्वी घरातून निघून गेले. मोलमजुरी करून त्यांची आई कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. मात्र, अपघातात त्यांची आईच हिरावली गेली आहे. त्यामुळे या घटनेने दोघी भेदरलेल्या आहेत. आपल्या घराभोवती झालेली ग्रामस्थांची गर्दी पाहून नेमके काय झाले, हे देखील त्यांना कळत नव्हते. खुशीला तर अजून नीट कळतही नाही. मात्र, तिच्यापेक्षा दीड वर्षांनी मोठी असलेल्या दीपिकाला आई आपल्याला सोडून गेल्याची जाणीव झाली आणि तिने हंबरडा फोडला. हे बघून लहानगी खुशीही तिला बिलगून रडू लागली. यावेळी उपस्थित नातेवाईकांसह ग्रामस्थांचे डोळे पाणावले.
एकाच कुटुंबातील 10 जणांचाही मृत्यू -
या अपघातात आबोडा गावातील एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अशोक वाघ या कुटुंब प्रमुखासोबत त्यांचा मुलगा सागर, पत्नी संगीता, अविवाहित पुतण्या नरेंद्र, अशोक यांची बहीण कमलाबाई मोरे, दुसरी बहीण सुमन इंगळे, भाची शारदा मोरे, विवाहित भाची दुर्गाबाई भालेराव, भाचा गणेश मोरे आणि भाचे जावई संदीप भालेराव यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. आभोडा गावातीलच सबनूर हुसेन तडवी आणि त्यांचा मुलगा दिलदार हुसेन तडवी या दोघांचाही मृत्यू झाला आहे. तडवी कुटुंबाचे गावात स्वतःचे घरदेखील नाही. हातमजुरी करून हे कुटुंब आपला चरितार्थ चालवत होते.