जळगाव -कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूदराबाबत एकेकाळी देशभरात सर्वात पुढे असलेल्या जळगाव जिल्ह्यासाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात आला असून, सध्या जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा 'रिकव्हरी रेट' 97.02 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य यंत्रणेने कठोर परिश्रमाच्या बळावर हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर सद्यस्थितीत 2.38 टक्के इतका आहे.
जळगाव जिल्ह्यात मार्च 2020 च्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाटल्याने झाला. मे ते ऑक्टोबर 2020 दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली होती. मृत्यूदरही वाढला होता. परंतु, अशाही परिस्थितीत जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने हार न मानता कोरोना विरुद्धचा लढा सुरूच ठेवला होता. शेवटी कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात आला. असे असताना दसरा आणि दिवाळीच्या काळात कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात आली. नंतर आरोग्य यंत्रणेने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. सद्यस्थितीत जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असून, कोरोनाचा रिकव्हरी रेट 97.02 टक्क्यांवर पोहोचला आहे.