जळगाव -कोरोना महामारीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला देखील कोरोनाचा फटका बसला असून, दूध संघाची आर्थिक घडी विस्कटली आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे दूध विक्रीवर निर्बंध आले आहेत. अशा परिस्थितीत दूध संघाच्या दूध विक्रीत सुमारे 30 ते 35 टक्के घट झाली आहे. दूध संघाकडून दररोज संकलित होणाऱ्या साडेतीन ते पावणे चार लाख लीटर दुधापैकी 25 ते 30 हजार लीटर दूध पडून राहत आहे. शिल्लक राहणाऱ्या या दुधाची पावडर तयार करण्यावाचून दुसरा पर्याय दूध संघासमोर नाही.
जळगाव जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात मोलाचा वाटा असलेल्या दूध संघाला कोरोनामुळे सद्यस्थितीत मोठा फटका बसला आहे. संपूर्ण जिल्हाभरातील दूध उत्पादक सोसायट्या तसेच दूध उत्पादकांकडून दूध संघ दररोज साडेतीन ते पावणे चार लाख लीटर दुधाचे संकलन करतो. त्यापैकी दीड ते पावणे दोन लाख लीटर दुधाची विक्री होते. उर्वरित दुधापासून दूध पावडर, तसेच बटर, श्रीखंड, तूप असे बाय प्रॉडक्ट्स तयार केले जातात. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार किराणा माल, फळे व भाजीपाला तसेच दूध विक्रीसाठी वेळेचे बंधन घालून दिले आहे. या अत्यावश्यक सेवा आता दररोज सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच सुरू असतात. दुपारनंतर किराणा दुकाने, दूध डेअरी, दुधाचे बूथ बंद राहत असल्याने किरकोळ विक्रेत्यांनी दूध संघाकडून दुधाची उचल पूर्वीपेक्षा निम्म्याहून अधिक प्रमाणात कमी केली आहे. त्यामुळे दूध संघाची दूध विक्री 30 ते 35 टक्क्यांनी घटली आहे.
बटर, दूध पावडरची निर्मिती
दूध संघाच्या नियोजनाबाबत बोलताना दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये म्हणाले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने शहरासह जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यानच व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. दूध विक्रेत्यांना देखील या 4 तासातच आपला व्यवसाय करावा लागत आहे. त्यामुळे दूध संघाची दूध विक्री 30 ते 35 टक्के घटली असून, दररोज 25 ते 30 हजार लीटर दूध शिल्लक राहत आहे. या दुधापासून दूध पावडर किंवा बटर निर्मिती करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दूध डेअरी व हॉटेल्स बंद असल्याने बाय प्रॉडक्ट्सची मागणीही कमी आहे. म्हणून आम्ही बटर आणि पावडर निर्मितीसाठी मालेगावच्या प्लांटमध्ये दूध पाठवत आहोत. विक्रेत्यांकडून दुधाची मागणी घटल्याने खूप फटका बसला आहे. शिवाय शिल्लक राहणाऱ्या दुधापासून जे पावडर आणि बटर तयार होत आहे, त्याच्या विक्रीची देखील चिंता आहे. त्याला चांगला दर मिळाल्याशिवाय आम्हाला ते विकता येत नाही. अशा परिस्थितीत दूध संघाची आर्थिक स्थिती विस्कटली आहे.