महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात कोरोना मृत्यू दरवाढीला आरोग्य यंत्रणेचा गलथानपणा कारणीभूत; 'डेथ ऑडिट कमिटी'चा निष्कर्ष - जळगाव कोरोना न्यूज

जळगावात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीपासूनच मृत्यूदर जास्त आहे. याची गंभीर दखल घेऊन आरोग्य मंत्रालयाने जिल्हा प्रशासनाकडून तसा अहवालही मागवला होता. जिल्ह्यातील मृत्यूदराची कारणे शोधण्यासाठी तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक विशेष समिती देखील नेमण्यात आली होती. या समितीने चौकशी करून राज्य सरकार आणि आरोग्य मंत्रालयाला अहवाल सादर केला आहे.

death-audit-committee
जळगावात कोरोनाच्या मृत्यूदरवाढीला आरोग्य यंत्रणेचा गलथानपणा कारणीभूत

By

Published : Jun 18, 2020, 3:53 PM IST

Updated : Jun 27, 2020, 5:00 PM IST

जळगाव- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा मृत्यूदर का जास्त आहे? याची कारणे शोधण्यासाठी आरोग्य मंत्र्यांच्या आदेशानंतर नेमण्यात आलेल्या 'डेथ ऑडिट कमिटी'ने गेल्या 10 दिवसात आरोग्य यंत्रणेच्या कारभाराची शस्त्रक्रिया केली असून त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. एकीकडे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना त्या तुलनेत कोविड रुग्णालयात तज्ञ डॉक्टर्स, नर्सेस व यंत्रसामग्रीची कमतरता असणे, आरोग्य यंत्रणेचे अयोग्य व्यवस्थापन आणि बेजबाबदारपणा तसेच कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतरही रुग्ण कोविड रुग्णालयात उशिराने दाखल होत असल्यानेच जळगावात कोरोनाचा मृत्यूदर वाढला आहे, असा निष्कर्ष 'डेथ ऑडिट कमिटी'ने काढला आहे. मृत्यूदर रोखण्यासाठीचे उपायही कमिटीने सुचवले असून, यासंदर्भातील सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आरोग्यमंत्र्यांना पाठविण्यात आला आहे.

जळगावात कोरोनाच्या मृत्यूदरवाढीला आरोग्य यंत्रणेचा गलथानपणा कारणीभूत

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढत्या मृत्यूदरामुळे जळगाव जिल्हा गेल्या महिनाभरापासून राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला आहे. देशात कोरोनाचा मृत्यूदर हा सुमारे 3 टक्के असताना जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर मात्र, देशाच्या चौपट म्हणजेच जवळपास 12 टक्के इतका आहे. जिल्ह्यात 28 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर 2 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला बळी गेला होता. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ते आता जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाच्या बळींची संख्या सातत्याने वाढतच आहे. या सव्वादोन महिन्यांच्या काळात कोरोना बळींची संख्या दीडशेपार गेली आहे. जळगावात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीपासूनच मृत्यूदर जास्त आहे. याची गंभीर दखल घेऊन आरोग्य मंत्रालयाने जिल्हा प्रशासनाकडून तसा अहवालही मागवला होता. जिल्ह्यातील मृत्यूदराची कारणे शोधण्यासाठी तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक विशेष समिती देखील नेमण्यात आली होती. या समितीने चौकशी करून राज्य सरकार आणि आरोग्य मंत्रालयाला अहवाल सादर केला होता. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांमध्ये वयोवृद्ध तसेच कर्करोग, हृदयरोग, उच्च रक्तदाब मधुमेह अशा आजारांनी आधीच ग्रस्त असलेल्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत असल्याचा निष्कर्ष समितीने काढला होता. परंतु, मृत्यूदर कमी करण्यासाठी त्यानंतरही उपाययोजना न झाल्यानेच कोरोनाचे बळी थांबले नाहीत. अखेर सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी जळगावचा एकदिवसीय दौरा करत आरोग्य यंत्रणेला फैलावर घेत मृत्यूदराच्या विषयाची चौकशी करण्यासाठी डेथ ऑडिट कमिटी नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तातडीने, जळगावातील डॉ. दीपक पाटील, डॉ. किरण मुठे, डॉ. धीरज चौधरी, डॉ. चंद्रय्या कांते यांच्यासह डॉ. विजय गायकवाड यांचा सहभाग असलेली कमिटी नेमली होती. या कमिटीने गेल्या 10 दिवसात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या प्रकरणांचा सविस्तर अभ्यास करत त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला.

कमिटीने काय अभ्यासले?'डेथ ऑडिट कमिटी'ने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शंभरहून अधिक रुग्णांचे केसपेपर, एक्स रे, त्यांचा मृत्यू अहवाल, कोरोनाची लागण होण्यापूर्वीची रुग्णांची मेडिकल हिस्ट्री अशा बाबी तपासल्या. त्याचप्रमाणे, काही रुग्णांच्या नातेवाईकांची प्रत्यक्ष भेट घेऊन तसेच काहींशी फोनवरून चर्चा केली. त्यात संबंधित रुग्णाला आधी कोणता आजार होता, तो औषधी कोणती घेत होता, त्यावर उपचार कसे सुरू होते, याबाबतची माहिती जाणून घेतली. त्यात मृत्यू झालेल्या निम्म्याहून अधिक रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब असे गंभीर आजार होते. या आजारांनी ग्रस्त असतानाच कोरोना झाल्याने त्यांचा लवकर मृत्यू झाला. याशिवाय कोविड रुग्णालयात रुग्णसंख्येच्या तुलनेत अपूर्ण डॉक्टर्स, नर्स, आवश्यक यंत्रसामग्रीचा अभाव आणि आरोग्य यंत्रणेचे अयोग्य व्यवस्थापन यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे, दुर्धर आजाराने आधीच ग्रस्त असलेल्या रुग्णांना कोविड रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आधीच्या आजाराची औषधी वेळेवर न मिळाल्याने त्यांची प्रकृती खालावत गेली. अशाने देखील रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जळगावात अधिक असल्याचे कमिटीचे म्हणणे आहे.यंत्रसामग्रीअभावी देखील गेले काही जीव-डेथ ऑडिट कमिटीच्या चौकशीत एक धक्कादायक बाबही समोर आली. ती म्हणजे, काही रुग्णांचे जीव कोविड रुग्णालयात आवश्यक ती यंत्रसामग्री नसल्याने गेले आहेत. आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 30 टक्के रुग्णांचा मृत्यू हा कोविड रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजन सिस्टिम नसल्याने गेल्याचा ठपका देखील कमिटीने चौकशी अहवालात ठेवला आहे. 60 पेक्षा अधिक वय असलेल्या आणि आधी दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती लवकर खालावते. त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते. मात्र, सेंट्रल ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांचा जीव गेल्याचेही कमिटीचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे, कोरोनाची लागण झाल्यानंतर उशिराने रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण जिल्ह्यात अधिक असल्याने मृत्यूची शक्यता वाढत असल्याचे डेथ ऑडिट कमिटीचे निरीक्षण आहे. म्हणजेच, कोरोनाबाबत जनजागृती करण्यात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कमी पडल्याचा ठपकाही कमिटीने ठेवला आहे.

मृत्यूदर रोखण्यासाठी हे सुचवले उपाय-

डेथ ऑडिट कमिटीने जिल्ह्यातील मृत्यू रोखण्यासाठी काही प्रमुख उपाय सुचवले आहेत. त्यात, कोविड रुग्णालयात रुग्णसंख्येसाठी आवश्यक असलेले डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ असावा, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम, व्हेंटिलेटर्स अशी अत्याधुनिक यंत्रसामग्री असावी, संशयितांचे स्क्रिनिंग, स्वॅब कलेक्शन व टेस्टिंग लवकर व्हावी, कोरोनाबाबत जनतेत व्यापक प्रमाणात जनजागृती व्हावी, असे उपाय सुचवण्यात आले आहेत.

Last Updated : Jun 27, 2020, 5:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details