महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात मृत कोरोनाबाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात होतोय हलगर्जीपणा - जळगाव कोविड रुग्णालय न्यूज

कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अत्यंत काळजीपूर्वक अंत्यसंस्कार करणे बंधनकारक आहे. त्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने निर्देशही दिलेले आहेत. मात्र, जळगावातील कोविड रुग्णालयात हलगर्जीपणा सुरू आहे. येथील आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह मृताच्या नातेवाईकांच्या मदतीने हाताळतात.

Covid Positive
कोरोनाबाधित

By

Published : Aug 14, 2020, 2:53 PM IST

जळगाव -कोविड रुग्णालय प्रशासनाकडून मृत कोरोनाबाधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात अक्षम्य हलगर्जीपणा केला जात आहे. एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह कोविड रुग्णालयातून स्मशानभूमीपर्यंत नेण्याचे काम मृताच्या नातेवाईकांनाच करावे लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अशा वेळी नातेवाईकांकडे सुरक्षेची कोणतीही साधने नसतात. कोविड रुग्णालयाच्या अशा भोंगळ कारभारामुळे जळगावात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्याची भीती आहे. यापूर्वी घडलेल्या अशा प्रकारांबाबत तक्रारी होऊनही कोविड रुग्णालयाकडून कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसत आहे.

जळगावात मृत कोरोनाबाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात होतोय हलगर्जीपणा

कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अत्यंत काळजीपूर्वक अंत्यसंस्कार करणे बंधनकारक आहे. त्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने निर्देशही दिलेले आहेत. मात्र, जळगावातील कोविड रुग्णालयात हलगर्जीपणा सुरू आहे. येथील आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह मृताच्या नातेवाईकांच्या मदतीने हाताळतात. धक्कादायक बाब म्हणजे, नातेवाईकांच्या अंगावर पीपीई कीट किंवा सुरक्षेची साधने नसतात. असाच एक प्रकार शुक्रवारीसमोर आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रस्ते साधन सुविधा व आस्थापना शाखेचे जळगाव जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम यांनी कोविड रुग्णालय आणि स्मशानभूमीतील गैरकारभाराचे आपल्या मोबाईलमध्ये छायाचित्रण करत या प्रकरणाला वाचा फोडली.

कोविड रुग्णालयात मृत कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह हाताळताना कशा प्रकारे हलगर्जीपणा होतो, याशिवाय स्मशानभूमीत मृताच्या नातेवाईकांकडून अंत्यसंस्कारासाठी पैसे घेतले जात असल्याचे राजेंद्र निकम यांनी केलेल्या छायाचित्रणात उघड झाले आहे. राजेंद्र निकम यांच्या मित्र परिवारातील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने ते शुक्रवारी सकाळी कोविड रुग्णालयात गेलेले होते. तेव्हा कोरोनाबाधित मृत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदन गृहातून अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेताना नातेवाईक कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय मृतदेह हाताळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी विचारणा केली असता, आमच्याकडे पुरेसे कर्मचारी नाहीत, मदत म्हणून नातेवाईकांना हातभार लावायला सांगतो, असे उत्तर कर्मचाऱ्यांकडून मिळाले.

रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडाच -

कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीत नेताना रुग्णवाहिका चालकाने दरवाजा उघडाच ठेवला होता. रस्त्यात त्या रुग्णवाहिकेमागे अनेक वाहने चालत होती. अनेक नागरिकांनी रुग्णवाहिका चालकाला दरवाजा उघडा असल्याची कल्पना दिली. मात्र, त्याने सुरुवातीला दुर्लक्ष केले. काही जण या प्रकाराचे छायाचित्रण करत असल्याचे पाहून शेवटी चालकाने रुग्णवाहिका थांबवून दरवाजा बंद केला.

स्मशानभूमीत उकळले जातात पैसे -

दरम्यान, हा गोंधळ इथेच थांबत नाही. निकम यांनी स्मशानभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार करताना तेथील कर्मचारी मृताच्या नातेवाईकांकडून पैसे घेत असल्याचेही छायाचित्रण केले. याबाबत कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी, आम्ही महानगरपालिकेचे कर्मचारी नाही, आम्ही ठेकेदाराकडे कामाला आहोत. नातेवाईक स्वखुशीने जेवढे पैसे देतात, यावर आमचे भागते, असे उत्तर त्यांनी दिले. या साऱ्या प्रकाराबाबत राजेंद्र निकम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली आहे. असा प्रकार सुरू राहिला तर जळगावात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. येत्या दोन दिवसात हा हलगर्जीपणा थांबला नाही तर मनसेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निकम यांनी दिला. दरम्यान, या प्रकरणासंदर्भात कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details