जळगाव -जिल्ह्यातील विविध धरणांच्या परिसरात यावर्षी चांगला पाऊस झाला असून या पावसामुळे जिल्ह्यातील तीन मोठ्या धरणांसह तेरापैकी अकरा मध्यम प्रकल्पांतही 100 टक्के उपयुक्त पाणी साठा झाला असून हे प्रकल्प ओसंडून वाहत आहेत.
जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये 36.27 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हतनूर धरणाचे 2 दरवाजे अर्धा मीटर, गिरणाचे 2 दरवाजे 0.60 मीटर तर वाघूरचे 2 दरवाजे 2.5 मीटरने उघडण्यात आले आहे, अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.
जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहे. अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा मध्यम प्रकल्प आहेत. तसेच 96 लघु प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा 1427.51 द.ल.घ.मी. म्हणजेच 50.40 टी.एम.सी. इतका आहे.
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 1027.10 द.ल.घ.मी. म्हणजेच 36.26 टी.एम.सी. इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 1027.10 द.ल.घ.मी. म्हणजेच 36.27 टी.एम.सी. उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात 9.00 टी.एम.सी. गिरणा 18.49 टी.एम.सी. तर वाघूर धरणात 8.78 टी.एम.सी. इतका उपयुक्त साठा असून ही धरणे 100 टक्के भरुन वाहत आहेत.
तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 203.91 द.ल.घ.मी. म्हणजेच 7.20 टी.एम.सी. इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 198.60 द.ल.घ.मी. म्हणजेच 7.01 टी.एम.सी. इतका उपयुक्त साठा आहे. तर जिल्ह्यातील 96 लघु प्रकल्पात 175.68 द.ल.घ.मी. म्हणजेच 6.20 टी.एम.सी. इतका उपयुक्त साठा आहे.
जिल्ह्यातील तेरा मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, बोरी व मन्याड या प्रकल्पांमध्ये 100 टक्के उपयुक्त साठा आहे. तर गुळ 86.36 टक्के व भोकरबारी धरणात 68.40 टक्के उपयुक्त साठा आहे.
हेही वाचा -'भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण आणि तुम्ही ठरवाल तेच धोरण', खडसे समर्थकांकडून मुक्ताईनगरमध्ये बॅनरबाजी