जळगाव - यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्व धरणांमधील पाणी पातळीत वाढ झाली आहे. हतनूर, गिरणा व वाघूर हे तीन्ही मोठे प्रकल्प 100 टक्के भरले असून, यांमध्ये 36.17 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. तसेच जिल्ह्यातील 13 मध्यम प्रकल्पांपैकी 11 प्रकल्प 100 टक्के भरले असून यांमध्ये 7.02 टीएमसी, तर लघु प्रकल्पांमध्ये 5.52 टीएमसी असा एकूण 48.71 टीएमसी पाणीसाठा आहे.
यावर्षी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने दुष्काळ हद्दपार झाला आहे. मागील वर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये 25.95 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने धरणांमधील साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहेत. तर अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे 13 मध्यम प्रकल्प आहेत. या सोबतच 96 लघु प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांचा एकूण उपयुक्त साठा 1427.51 दलघमी म्हणजेच 50.40 टीएमसी आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये आत्तापर्यंत 96.63 टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे.
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमधील उपयुक्त साठा 1027.10 दलघमी म्हणजेच 36.26 टीएमसी असून, सध्या या प्रकल्पांमध्ये 1024.30 दलघमी म्हणजेच 36.17 टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात 8.91 टीएमसी, गिरणा धरणात 18.49 टीएमसी, तर वाघूर धरणात 8.78 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.
यावर्षी हतनूर धरण क्षेत्रात 1111 मिमी, गिरणा धरण क्षेत्रात 1005 मिमी तर वाघूर धरण क्षेत्रात 1220 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील 7.20 टीएमसी असून, आत्तापर्यंत या प्रकल्पांमध्ये 7.02 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. तर लघु प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 196.50 दलघमी म्हणजेच 6.93 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 5.52 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.
जिल्ह्यातील तेरा मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, मन्याड, बोरी हे 11 मध्यम प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तर गुळ प्रकल्पात 90.42 टक्के, भोकरबारी प्रकल्पात 53.36 टक्के उपयुक्त साठा आहे. तसेच अभोरा, मंगरुळ, सुकी, अग्नावती, तोंडापूर, अंजनी, बोरी, मन्याड या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दुष्काळ हद्दपार; खरीप बेजार
यावर्षी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने दुष्काळ हद्दपार झाला आहे. मात्र, खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहे. चांगला पाऊस झाल्याने सध्या शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर आहे. पावसामुळे नद्या, नाले, बंधारे तसेच विहिरी पाण्याने तुडूंब भरल्या आहेत. पाणी असल्याने रब्बी हंगामात गहू, हरभरा, मका,इ पिकांचे भरघोस उत्पादन घेणे शक्य होणार आहे.