जळगाव -मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने पीक विमा योजनेच्या जुन्या निकषानुसार भरपाई द्यावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा काढलेला नाही, त्यांनाही सरसकट पंचनामे करून भरपाई दिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मागील आठवड्यात झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची ते पाहणी करत आहेत. दौऱ्याला सुरुवात केल्यानंतर त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे शेतांमध्ये जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर ते बोलत होते.
पीक विम्याचे जुनेच निकष असावेत-
देवेंद्र फडणीस पुढे म्हणाले की, आमचे सरकार असताना आम्ही केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेचे निकष ठरवण्यासाठी दिवंगत आमदार हरिभाऊ जावळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने वातावरणाची स्थिती व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन पीक विमा योजनेचे निकष ठरवले होते. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महा विकास आघाडी सरकारने पीक विमा योजनेचे निकष बदलले. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी तर संपूर्ण हंगामात राज्य सरकारने पीक विमा योजनेसाठी टेंडर काढले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकली नाही, असेही फडणवीस म्हणाले.