जळगाव- जिल्ह्यात सातत्याने सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन आणि कापूस पिकाची दयनीय अवस्था झाली आहे. पावसात भिजलेल्या कापसासह धान्याला जागेवरच कोंब फुटले आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकऱ्यांवर ऐन दिवाळीत संकट कोसळले आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून एकही नक्षत्र रिकामे गेले नसून सतत पाऊस पडत आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या सुमारे 140 टक्के पाऊस पडला आहे. सततच्या पावसामुळे आधी पूर्वहंगामी उन्हाळी कपाशीचे नुकसान झाले. दसरा झाल्यानंतर घरात कापूस आल्याने दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे यावर्षी अक्षरश: दिवाळे निघाले आहे. पावसामुळे जमिनीलगतच्या कैऱ्या तसेच बोंड कुजल्यानंतर वरचा बहार तरी आपल्या हाती येईल, अशी आशा शेतकरी बाळगून होते. प्रत्यक्षात पाऊस थांबला नसल्याने वरील फांद्याना लागलेल्या कापसाच्या बोंडांमधील सरकीलाही आता कोंब फुटले आहेत. बियाणे, खते, फवारणी तसेच मशागतीसाठी अतोनात खर्च करून सुद्धा घरात एकही बोंड न आल्याने कापूस उत्पादकांना डोक्याला हात लावावा लागला आहे.
हेही वाचा - मी म्हातारा झालो असेल तर घरी नातू-पणतू सांभाळेन, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया