जळगाव -महाविकास आघाडीच्या 'महाराष्ट्र बंद' आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी एका आईस्क्रीम पार्लरवाल्याशी वाद घालून दादागिरी केल्याचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. जळगाव शहरातील नवीपेठेत गोलाणी मार्केटजवळ सोमवारी दुपारी हा संतापजनक प्रकार घडला आहे. शिवसेनेच्या एका महिला कार्यकर्तीने शीतपेय व खाद्यपदार्थ घेऊन आपल्याला त्याचे पैसे न दिल्याने हा सारा वाद घडल्याचा संबंधित दुकानदाराचा आरोप आहे. तर, आपण खाद्यपदार्थ घेतले तेव्हाच पैसे दिल्याचा दावा त्या महिला कार्यकर्तीने केला आहे.
काय आहे नेमका प्रकार?
उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथे आंदोलक शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ काल महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. जळगावात देखील हे आंदोलन पार पडले. आंदोलनावेळी शिवसेनेच्या एका महिला कार्यकर्तीने नवीपेठेतील कीर्तीकुमार चोरडिया नामक व्यक्तीच्या दुकानातून आईस्क्रीम पार्लरमधून शीतपेय व खाद्यपदार्थ घेतले. त्याचे पैसे देते असे सांगत तिने, पैसे न देताच तेथून काढता पाय घेतला. ती महिला कारमधून निघून जात असल्याचे पाहून चोरडिया यांनी पैसे मागण्यासाठी त्यांच्या मागे धाव घेतली. तेव्हा कारमध्ये बसलेल्या महिलेने कसले पैसे, आपण पैसे देणार नाही, असे उत्तर चोरडिया यांना दिले. त्यामुळे ते संतप्त झाले. दोघांमध्ये तू-तू मैं-मैं झाली.