जळगाव -तौक्ते चक्रीवादळात आमच्या मॅथ्यू असोसिएशन कंपनीचे जहाज सापडले होते. वादळामुळे उंच उसळणाऱ्या लाटांमुळे जहाजात पाणी शिरले. आता सर्व संपले, आपण जिवंत वाचणार नाही, असे वाटले. जीव वाचवण्यासाठी जहाजातील ३०० जणांनी समुद्रात उड्या मारल्या. लाईफ जॅकेटच्या आधाराने तुफान लाटांना सामोरे गेलो. डोळ्यांदेखत अनेक सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. आठ तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर नौदलाचे जवान आमच्या मदतीला धावून आले. माझ्यासह सुमारे १८० जण या संकटातून बचावले, असा थरारक अनुभव जळगावातील वैभव माधवराव पाटील याने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितला आहे.
वैभव पाटील हा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील गोविंद नगरी येथील रहिवासी आहे. तो मुंबईच्या मॅथ्यू असोसिएट या कंपनीत मर्चंट नेव्हीच्या फायरमन ब्रँचमध्ये गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहे. तौक्ते चक्रीवादळातून सुखरूप बचावल्यानंतर तो घरी आला आहे. त्याने आपबिती कथन केली आहे.
'त्या दिवशी सकाळी उठलो अन्..'
वैभव म्हणाला, मुंबईपासून सुमद्रात ६० कि.मी. अंतरावर असलेल्या ओएनजीसीच्या हिरा फिल्डवर नोव्हेंबर २०२० पासून रवाना झालो होतो. माझ्यासह अनेक सहकारी या प्रकल्पावर कार्यरत आहे. काम सुरळीत सुरू होते. चार दिवसांचे काम अपूर्ण होते. ते आटोपून मुंबईत परतणार, तत्पूर्वीच तौक्ते वादळाचा संदेश जहाजाच्या कॅप्टनला मिळाला. जहाज समुद्रातून बाहेर काढण्याच्या सूचना देऊनही ओएनजीसीच्या हिरा फिल्डवरच थांबविले. १५ मेपासूनच वाऱ्यांचा वेग वाढला. १६ मे रोजी वाऱ्यासह लाटाही वाढल्या, रात्री १० पासून वादळाने रौद्ररूप धारण केले. रात्र कशीबशी काढली. १७ मे रोजी झोपेतून उठलो तर जहाजात पाणी शिरले होते. ते बाहेर फेकण्यासाठी आम्ही सर्व जण भिडलो. मात्र, वादळाचा वेग प्रचंड असल्याने लाटांपुढे आमचा निभाव लागला नाही. जहाजाचे सर्वच्या सर्व आठही नांगर लाटांनी उद्ध्वस्त केले. त्यामुळे जहाज प्रचंड हेलकावे खाऊ लागले.