जळगाव - कोरोनाच्या संकटाने आलेले मंदी जळगावातील सुवर्ण बाजाराने विजयादशमीच्या मुहुर्तावर झटकली आहे. दसर्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहक सराफी पेढ्यांमध्ये गर्दी करत आहेत. त्यामुळे सुवर्णनगरीत चैतन्य संचारल्याचे चित्र आहे.
सोन्याच्या वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांमुळे जळगावची ओळख सुवर्णनगरी म्हणून आहे. यंदा जडावाचे पेंडल, आकर्षक कुवेती दागिने सराफा दुकानांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी सराफी पेढी चालकांकडून विविध योजनांचा वर्षाव केला जात आहे. कोरोनानंतर प्रथमच सुवर्ण बाजारात उलाढाल वाढली आहे. त्यामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दसर्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीकरता ग्राहकांची गर्दी यंदा सोन्याच्या बाजारपेठेत खरेदीकरता विविध पर्याय उपलब्ध
जडावाचे पेंडल सेट (कलेक्शन) हा कुंदन, लाख, मीना, मोती, डायमंड, क्रिस्टल आदी स्टोनपासून बनणारा खास दागिना दसर्यानिमित्त बाजारात आला आहे. ज्यात 22 व 24 कॅरेट सोने व स्टोनचा सुरेख मिलाफ करून दागिना घडतो. हा दागिना दोन तोळ्यापासून पाच तोळ्यापर्यंतच्या वजनात उपलब्ध आहे. त्यासोबतच विविध सुवर्णपेढींनी कुवेती ज्वेलरीची विविध श्रेणी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात नेकलेस, बांगड्या, अंगठ्या, पेंडलसेट, चेन, हार, कडे हे पाच ग्रॅमपासून ते 50 ग्रॅम वजनी दागिन्यांच्या दीडशेहून अधिक डिझाईन उपलब्ध आहेत. त्याच सोबतच ग्राहकाने स्वत: आणलेल्या किंवा पसंत केलेल्या आकर्षक डिझाईनप्रमाणे हुबेहुब दागिना बनवून देण्याची सुविधाही अनेक पेढ्यांमध्ये उपलब्ध आहे.
लग्नसराईनिमित्त खास दागिने उपलब्ध-
कोरोनामुळे लग्नसराई पुढे ढकलली आहे. कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर लग्नांचा बार उडणार आहे. याच अनुषंगाने 'वेडिंग ज्वेलरी'ला मोठी मागणी आहे. लग्नाच्या खरेदीनिमित्त अनेक दागिन्यांचे प्रकार उपलब्ध आहेत. अधिकमास महिन्यामुळे सोने-चांदीच्या दागिन्यांना खूप मागणी आहे, अशी माहिती जळगावातील प्रसिद्ध बाफना ज्वेलर्सचे संचालक सिद्धार्थ बाफना यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. दसर्याला नवीन वास्तू, वाहन, सोने व चांदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, नवीन कपडे खरेदीचा मुहूर्त साधला जातो. दसर्यासाठी बाजारपेठही सज्ज झाली आहे.
आपट्याच्या आकाराच्या सोन्याच्या पानांना खास मागणी-
दसर्यानिमित्त अनेक सराफी पेढ्यांनी आपट्याच्या आकाराच्या सोन्याची पाने विक्रीसाठी ठेवली आहेत. ही सोन्याची पाने अर्धा ग्रॅम ते दोन ग्रॅम वजनात उपलब्ध आहेत. जळगाव सुवर्ण बाजाराचे हे प्रमुख वैशिष्ट मानले जाते. काही ग्राहक सोन्याची पाने खरेदी करून नातेवाईकांना देतात. तर काही नागरिक दसर्याच्या मुहूर्तावर केलेली शुभ खरेदी म्हणून ही सोन्याची पाने घरात ठेवतात.
कोरोनानंतर हळूहळू सावरतोय सुवर्ण बाजार-
यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे टाळेबंदी जाहीर झाल्याने त्याचा विपरित परिणाम सुवर्ण बाजारावर झाला. तब्बल पाच ते सहा महिने टाळेबंदी असल्याने सुवर्ण बाजाराची उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली होती. यातून सराफ व्यावसायिकांना सुमारे 300 ते 400 कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने सुवर्ण बाजार हळूहळू पूर्वपदावर येत आहे. नवरात्रीपासून सुवर्ण बाजारातील व्यवहारांना गती येऊ लागली आहे. दसरा आणि दिवाळीच्या काळात सुवर्ण बाजाराची घडी पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा सराफ व्यावसायिकांना आहे.
कोरोनामुळे जागतिक बाजारपेठ अस्थिर-
कोरोनामुळे सध्या जागतिक बाजारपेठ अस्थिर आहे. त्यामुळे सोने व चांदी या धातुंच्या दरात चढ-उतार होत आहेत. सद्यस्थितीत सोने व चांदीचे दर काही प्रमाणात कमी झाल्याने ग्राहक खरेदीसाठी पुढे येत आहेत. प्रत्येकजण आपल्या बजेटनुसार सोने-चांदी खरेदी करत आहे.
यापुढे भारतातच ठरणार सोन्याचे दर-
भारतातील सोन्याचे दर सध्या जागतिक बाजारपेठेतील स्थितीनुसार निश्चित होतात. मात्र, आगामी काळात भारतातच या दोन्ही धातूंचे दर ठरणार आहेत. गुजरात राज्यात इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंजची स्थापना होणार आहे. त्यानंतर या एक्स्चेंजमध्ये सोन्याचे दैनंदिन दर निर्धारित केले जाणार आहेत. सोने आणि चांदीचे स्पॉट ट्रेडिंग करण्याची संधी व्यापारी तसेच गुंतवणूकदारांना इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंजमध्ये उपलब्ध होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशातच सोने आणि चांदीचे भाव निश्चित करण्यासाठी मदत होणार आहे. सध्या लंडन बुलियन मार्केट असोसिएशनद्वारे (एलबीएमए) निर्धारित करण्यात आलेल्या दरानुसार देशातील सोन्याचे दर ठरतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील सट्टेबाजांमुळे सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होतो, त्याचा फारसा फरक इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंजमुळे पडणार नाही, अशी माहितीही सराफ व्यावसायिक सिद्धार्थ बाफना यांनी दिली.