जळगाव -युकेमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून जळगाव शहर महापालिका क्षेत्रात 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मंगळवारी दिली.
राज्य शासनाने राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात आजपासून 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राऊत बोलत होते. या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते.
अत्यावश्यक सेवांना सशर्त परवानगी-
जिल्हाधिकारी राऊत पुढे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आलेला असताना, युकेमध्ये आता कोरोनाच्या नवीन विषाणूचे रुग्ण आढळून येत आहे. त्यातच सध्या जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढत असल्याने न्युमोनियासारखे आजार बळावतात. याबाबत दक्षता घेणे आवश्यक असल्याने महापालिका क्षेत्रात संचारबंदी लागू करण्यात येत आहे. संचारबंदीच्या काळात वैद्यकीय सेवांना सूट देण्यात आली आहे. मात्र, यासाठी पुरेसे पुरावे सोबत ठेवणे आवश्यक आहे. तसेच रात्री बाहेरगावावरुन येणाऱ्या प्रवाशांना कोणतीही अडचण येणार नाही. नागरिकांनी लग्न समारंभ व इतर कार्यक्रम रात्री 11 पूर्वीच उरकणे आवश्यक आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार वर्गास कोणतीही अडचण येवू नये, याकरीता या कालावधीत त्यांच्या कामाच्या वेळा या रात्री 11 पूर्वी व सकाळी 6 नंतर ठेवण्याबाबत आस्थापनांना सूचना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.