जळगाव -जिल्ह्यात यावर्षी पाऊस महिनाभर उशिराने दाखल झाला. त्यामुळे पेरण्या देखील उशिराने झाल्या. अजूनही दमदार पाऊस पडत नसल्याने खरिपाची पेरणी 100 टक्के झालेली नाही. जिल्ह्यात आजमितीला 90 टक्के पेरण्या झाल्या असून, त्यात कडधान्यवर्गीय पिकांचे लागवड क्षेत्र 35 ते 40 टक्क्यांनी घटले आहे. पावसाने सुरुवातीलाच खंड दिल्यामुळे उडीद, मूग व तूर अशा कडधान्य पिकांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. चांगला पाऊस झाला नाही तर कडधान्य पिकांच्या उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट होईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे.
आतापर्यंत 90 टक्के पेरणी, सर्वाधिक क्षेत्र कापसाचे-
जळगाव जिल्ह्यात दरवर्षी सुमारे साडेसात ते पावणे आठ लाख हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी होते. त्यात सर्वाधिक क्षेत्र हे कापूस या नगदी पिकाचे असते. यावर्षी आतापर्यंत 90 टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. त्यात सर्वाधिक 5 लाख 22 हजार 994 हेक्टर क्षेत्र कापसाचे आहे. सिंचनाची सुविधा नसलेल्या 2 लाख 94 हजार 265 हेक्टरवर तर 2 लाख 28 हजार 729 हेक्टर सिंचनाखालील क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे. त्या खालोखाल मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीनची लागवड झाली आहे.
कडधान्य पिकांचे क्षेत्र 35 ते 40टक्क्यांनी घटले-
जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य तालुक्यात कापसासोबतच उडीद, मूग आणि तूर या कडधान्यवर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. दरवर्षी साधारणपणे या पिकांचे क्षेत्रफळ 80 ते 85 हजार हेक्टर इतके असते. मात्र, यावर्षी पेरणीच्या काळातच पावसाने ओढ दिल्याने आतापर्यंत केवळ 50 ते 52 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. पाऊस उशिराने दाखल झाल्यामुळे कडधान्य पिकांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. या पिकांची लागवड तब्बल दीड ते दोन महिने उशिराने झाली. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात 20 हजार 306 हेक्टर उडदाची तर मुगाची 21 हजार 867 हेक्टरवर पेरणी झाली आहे. तुरीची लागवड अवघ्या 11 हजार हेक्टरवर आहे. एरवी उडदाची लागवड 30 ते 35 हजार हेक्टर, मुगाची 35 ते 40 हजार हेक्टर आणि तुरीची लागवड 16 ते 18 हजार हेक्टर असते. मात्र, पाऊस नसल्याने कडधान्य पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.