महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रात्रीपासून जनता कर्फ्यू लागणार असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी - jalgaon news today

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आज (गुरुवारी) सकाळपासून बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

jalgaon janata curfew
jalgaon janata curfew

By

Published : Mar 11, 2021, 7:36 PM IST

Updated : Mar 11, 2021, 7:56 PM IST

जळगाव - शहरात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू असून, दररोज शेकडोंच्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने कोरोनाची साखळी खंडित करणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने, जिल्हा प्रशासनाने महापालिका हद्दीत 3 दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आज (गुरुवारी) सकाळपासून बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांची सर्वाधिक गर्दी

शहरातील सुभाष चौक, दाणाबाजार, सराफ बाजार, बळीराम पेठ, फुले मार्केट, गोलाणी मार्केट परिसरात फळे, भाजीपाला तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. बळीराम पेठ, सुभाष चौक परिसर हा शहरातील मुख्य बाजारपेठेचा भाग आहे. याठिकाणी फळे व भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची सर्वाधिक गर्दी झाली. त्याचप्रमाणे, दाणाबाजारात किराणा सामानाची खरेदी करताना नागरिक नजरेस पडले. पुढचे तीन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही प्रकारच्या सेवांवर बंधने असल्याने नागरिकांनी ऐनवेळी गैरसोय नको म्हणून जीवनावश्यक वस्तूंच्या अवांतर खरेदीवर भर दिल्याचे चित्र बाजारपेठेत होते.

हेही वाचा -इतिहासात पहिल्यांदा महाशिवरात्रीला महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील सालबर्डीत शुकशुकाट

फळे, भाजीपाला महागला

शहरात पुढचे तीन दिवस जनता कर्फ्यू आहे. या काळात फळे तसेच भाजीपाला विक्रीदेखील बंद राहणार आहे. हीच संधी साधून फळे व भाजीपाला विक्रेत्यांनी दर वाढवले होते. सफरचंद, केळी, द्राक्षे यासारख्या फळांचे दर गुरुवारी प्रतिकिलो मागे 15 ते 20 रुपयांनी वाढले. तर दुसरीकडे, भाजीपालाही काही प्रमाणात महाग झाला. बटाटे, टमाटे, मिरची, वांगे, गिलके यांचे दर प्रतिकिलो मागे 10 ते 15 रुपयांनी वाढल्याचे दिसून आले. खाद्यतेलाच्या किंमतीही 5 ते 10 रुपयांनी वाढल्या आहेत.

15 मार्च रोजी सकाळपर्यंत असतील निर्बंध

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विशेष करून, जळगाव शहरात कोरोना वेगाने हातपाय पसरत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून जळगाव शहर हे कोरोनाचे प्रमुख हॉटस्पॉट आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने जळगाव महापालिका हद्दीत 3 दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. 12 ते 14 मार्चदरम्यान हा जनता कर्फ्यू असणार आहे. या कर्फ्यूच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर बंधने घालण्यात आली आहे. जनता कर्फ्यूला आज (11 मार्च) रात्री 8 वाजेपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर पुढे 3 दिवस म्हणजेच 15 मार्च रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. कर्फ्यू सुरू असताना बाजारपेठा बंद असतील. जनता कर्फ्यूचा निर्णय हा समाजसेवी संघटना, व्यापारी संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून घेण्यात आला आहे.

हेही वाचा -कोरोनामुळे मंदिरं बंद; भाविकांनी घेतले प्रवेशद्वाराजवळून महादेवाचे दर्शन

या बाबींना असेल मुभा

राज्यातील इतर भागातून होणारी प्रवासी वाहतूकदेखील सुरू राहणार आहे. टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांची सेवा केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी तसेच शासकीय, औद्योगिक आस्थापना कर्मचारी यांची वाहने आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी राहिल. हॉस्पिटल ओपीडी व रुग्णवाहिका सेवा सुरू राहील. सर्व प्रकारचे रुग्णालये, औषधांची विक्री दुकाने, दूध खरेदी केंद्र, कृषी आणि औद्योगिक आस्थापना सुरू राहतील. शासकीय कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती असणार आहे. पेट्रोल पंप केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी सुरू राहतील. रेल्वे, विमानसेवा, मालवाहतूक सुरू राहील. तसेच कुरियर, गॅरेज, वर्कशॉप, वृत्तपत्र व मीडिया सेवा, बँक व वित्तीय संस्था पोस्टल सेवा, पशुखाद्य केंद्रे सुरू राहतील.

या गोष्टी राहतील पूर्णपणे बंद

शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, खाजगी क्लासेस, बाजारपेठेतील दुकाने बंद राहतील. सर्व प्रकारचे हॉटेल बंद राहतील. मात्र, पार्सल सेवा सुरू राहणार आहे. किरकोळ भाजीपाला आणि फळे विक्री, धार्मिक स्थळे, सभा, मेळावे, बैठका, शासकीय व खासगी बांधकामे, शॉपिंग मॉल, मार्केट, किराणा दुकाने, लिकर शॉप, सलून, खाजगी कार्यालये, गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृह, नाट्यगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षक गृहे, क्रीडा स्पर्धा, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे, प्रदर्शने, मेळावे, संमेलन, आठवडे बाजार, कार्यक्रम बंद राहतील.

Last Updated : Mar 11, 2021, 7:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details