जळगाव-ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी दत्त जयंतीच्या मुहूर्तावर आपले अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी तहसील कार्यालयामध्ये एकच गर्दी केली होती. मंगळवारी दिवसभर जळगाव तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची कागदपत्रे जमवाजमव करण्याची धावपळ सुरू होती.
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दाेन दिवस उरले आहेत. मंगळवारी दत्त जयंतीच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत नामनिर्देशन सादर करण्यासाठी सुरुवातीच्या तीन दिवसांत अल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातून पहिल्या दोन दिवसात केवळ ७१ अर्ज दाखल झाले होते. साेमवारी ही संख्या हजाराच्या पुढे गेली. आता मंगळवार व बुधवार असे दोनच दिवस अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने मंगळवारी दत्तजयंतीच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले.