जळगाव-शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने सात दिवसांचा लॉकडाऊन लागू केला होता. हा लाॅकडाऊन संपल्यानंतर मंगळवारी बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. मार्केट वगळता सर्व दुकाने सम-विषम प्रमाणात उघडल्यामुळे खरेदीसाठी सर्वच दुकानांबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे, लॉकडाऊन जाहीर होण्याआधी गेल्याच आठवड्यात सोमवारीही नागरिकांनी प्रचंड गर्दी करत खरेदी केली होती. आता लॉकडाऊन उघडल्यानंतर पहिल्याच दिवशी नागरिकांनी अक्षरश: झुंडीने गर्दी करत, कोरोनाला पुन्हा निमंत्रण दिले आहे.
लॉकडाऊननंतर बाजारपेठेत उसळली गर्दी.. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा! - जळगाव लाॅकडाऊन बातमी
मनपाने सम-विषम प्रमाणे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी मंगळवारी मुख्य रस्त्यालगत या नियमांचा सर्रासपणे भंग झाल्याचे चित्र पहायला मिळाले. अनेक दुकानदारांनी शटर बंद करून व्यवसाय सुरू ठेवला होता. अनेक मार्केटच्या तळमजल्यालगतच्या दुकानांमध्ये ग्राहकांना प्रवेश देवून शटर बंद केले जात असल्याचे आढळून आले.
सात दिवसांचा कडक लॉकडाऊन घेतला तर कोरोनाची साखळी तुटेल व संसर्ग काही प्रमाणात नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा असताना, अनलॉकच्या पहिल्याच दिवशी गेल्याच आठवड्यात सोमवारप्रमाणेच नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. अनलॉक झाले असले तरी महापालिकेने केवळ रस्त्यावरील दुकानांना सम-विषम प्रमाणात व्यवसाय सुरु करण्याची परवानगी दिली असून, मार्केटमधील दुकाने उघडण्यास अजूनही परवानगी दिलेली नाही. मंगळवारी सात दिवसांच्या लॉकडाऊननंतर दुकाने उघडतील या आशेने बी.जे.मार्केट, महात्मा फुले, गोलाणी, महात्मा गांधी मार्केटबाहेर मार्केटमधील दुकानदारांनी मोठी गर्दी केली होती.
किराणा, भाजीपाला खरेदीसाठी झुंबड...
सात दिवसात किराणा व भाजीपाला विक्री देखील बंद करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी १० वाजेपासून शहरातील मुख्य भागातील किराणाच्या दुकानांवर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. यासह भाजीपाला खरेदीसाठीही नागरिकांची झुंबड उडालेली पहायला मिळाली. शिवतिर्थ मैदान, ख्वाजामीया चौक, महाबळ चौक, गिरणा टाकी परिसरात भाजीपाला विक्रेत्यांनीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करत आपली दुकाने थाटली होती.
चोरी-चोरी चुपके-चुपके व्यवसाय सुरू...
मनपाने सम-विषम प्रमाणे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी मंगळवारी मुख्य रस्त्यालगत या नियमांचा सर्रासपणे भंग झाल्याचे चित्र पहायला मिळाले. अनेक दुकानदारांनी शटर बंद करून व्यवसाय सुरू ठेवला होता. अनेक मार्केटच्या तळमजल्यालगतच्या दुकानांमध्ये ग्राहकांना प्रवेश देवून शटर बंद केले जात असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे प्रत्येक चौकात महापालिकेचा कर्मचारी उभा असतानाही हे प्रकार सर्रासपणे होताना दिसून आले.