जळगाव -जिल्ह्यासाठी राज्य शासनाकडून कोरोना लसीचे 40 हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 133 केंद्रांवर बुधवारपासून लसीकरण पूर्ववत सुरू झाले. दरम्यान, जळगाव शहरातील महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात तर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.
जळगावात कोरोना लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी लसीकरणाला पुन्हा सुरूवात
गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून होणारा कोरोना लसीचा पुरवठा ठप्प झाल्याने जळगाव जिल्ह्यात लसीकरण थांबले होते. जिल्ह्यातील सर्वच 133 केंद्रांवर ही परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता कोरोना लसीचे 40 हजार डोस प्राप्त झाले आहेत. कोरोना लसीचे डोस मिळाल्यानंतर काल (मंगळवारी) दिवसभरात जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर वितरण करण्यात आले होते. नंतर आज (बुधवार) सकाळपासून लसीकरणाला पुन्हा सुरूवात झाली.
लसीचा साठा मर्यादित
जिल्ह्यासाठी प्राप्त झालेले कोरोना लसीचे 40 हजार डोस हे पुरेसे नाहीत. सद्यस्थितीत लसीकरण पूर्ववत सुरू झाले असले तरी, एवढ्या डोसमुळे आगामी तीन ते चार दिवसच लसीकरणाची प्रक्रिया सुरू ठेवता येणार आहे. त्यामुळे अजून मागणी राज्य शासनाकडे नोंदवण्यात आली आहे. लवकरच पुरेशा प्रमाणात डोस उपलब्ध होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला.
शाहू रुग्णालयात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा!
कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्याने जळगाव शहरातील सर्वच लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली आहे. छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात तर नागरिकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हात थांबावे लागू नये म्हणून उभारण्यात आलेल्या मंडपात देखील गर्दी मावत नव्हती. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात उन्हातच नागरिक प्रतीक्षा करत होते. यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचादेखील समावेश होता.