महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातच उडाला 'सोशल डिस्टन्सिंग'चा बोजवारा, मुलाखतीसाठी उमेदवारांची तोबा गर्दी - jalgaon latest news

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदे भरण्यासाठी आज बुधवार (दि. 10 जून) जिल्हाधिकारी कार्यालयात थेट मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांना कागदपत्रांसह बोलावण्यात आले होते. मात्र या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या नव्हत्या. यामुळे येथे सामाजिक अंतराचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले.

crowd in jalgaon
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली गर्दी

By

Published : Jun 10, 2020, 1:49 PM IST

Updated : Jun 10, 2020, 2:28 PM IST

जळगाव -जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे अजून एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदे भरण्यासाठी आज बुधवार (दि. 10 जून) जिल्हाधिकारी कार्यालयात थेट मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांना कागदपत्रांसह बोलावण्यात आले होते. यावेळी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेले नसल्याने प्रचंड गोंधळ उडाला. याठिकाणी 'फिजिकल डिस्टन्सिंग'चा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली गर्दी

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने होत आहे. दिवसेंदिवस मोठ्या संख्येने नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेवर कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदे त्वरित भरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत फिजिशियन, फार्मासिस्ट, स्टोअर ऑफिसर, स्टाफ नर्स, मेडिकल ऑफिसर अशा अनेक पदांची जाहिरात काढण्यात आली होती. ही पदे भरण्यासाठी आज थेट मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आले होते.

वृत्तपत्रातील जाहिरात पाहून बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून जिल्ह्यातील शेकडो उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र आले होते. या ठिकाणी गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नसल्याने मोठा गोंधळ उडाला. फिजिकल डिस्टन्सिंगचा देखील फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अशाप्रकारच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे, असे असताना जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेल्या बेफिकीरीमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

मुलाखत प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांची मोठ्या संख्येने गर्दी झाल्याने जिल्हा प्रशासनाला देखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अनेक उमेदवारांना इच्छा असूनही मुलाखत देता आली नाही. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाल्याचे चित्र होते. एकप्रकारे जिल्हा प्रशासनाकडून बेरोजगारांची थट्टा झाल्याच्या संतप्त भावना देखील अनेकांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा -मंत्री गुलाबराव पाटील सध्या 'या' कारणामुळे आहेत चर्चेत

Last Updated : Jun 10, 2020, 2:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details