जळगाव - अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र, राज्यात राजकीय नेतेमंडळी सरकार स्थापण्याच्या घोळात अडकलेली असल्याचा लाभ प्रशासकीय यंत्रणा उचलताना दिसत आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे ६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिलेले असताना जिल्ह्यात अद्यापही पंचनाम्यांचे काम धीम्यागतीने सुरूच आहे. त्यामुळे शेतकरीवर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात २१ ते २९ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे १ हजार ४६८ गावांमधील ६ लाख १ हजार ३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस या पिकांना मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडून हवालदिल झाला आहे. शेतीला लागलेला खर्चही निघालेला नाही.
हेही वाचा -'केंद्र सरकार किमती नियंत्रणात ठेवण्याकरता १ लाख टन कांदा आयात करणार'
४ नोव्हेंबरला राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याच्या सूचना केल्यानंतर प्रशासनाने हालचाली करत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतींचे पंचनामे करण्यास सुरूवात केली. मुख्य सचिवांनी ६ तारखेपर्यंत व जास्तीत जास्त ८ तारखेपर्यंत हे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रशासकीय यंत्रणा कामात कुचराई करत असल्याचे पाहायला मिळत आहे.